राज्यात जमिनींच्या मोजण्या अचूक गतीने करण्यासाठी एप्रिल महिन्यात राज्याने ९०२ रोव्हर मशिन खरेदी केल्यानंतर आता आणखी ६०० रोव्हर मशिन खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जमीन मोजणी म्हणजे काय? ही मोजणी कशी करतात? रोव्हर तंत्रज्ञानद्वारे जमीन मोजण्याची पद्धत कशी आहे? शेतकऱ्याला याचा काय फायदा? जाणून घेऊया...
जमीन मोजणी म्हणजे काय? स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे बहुतांश लोकांचे स्वप्न असते. गुंतवणूक म्हणून अनेकजण जमीन खरेदी करतात. पण आपण किती जमीन विकत घेतली आहे? किती क्षेत्र आपल्या नावावर आहे किंवा आपल्या जमिनीची मालकी कुठून कुठवर आहे? हे समजून घेण्यासाठी जमीन मोजणे आवश्यक असते. जमीन आली कि त्या भोवती असणारे मालकी हक्काचे वाद विवादही आलेच. हे सोडवण्यासाठीदेखील जमिनीची प्रथम मोजणी करून मूळ नकाशाच्या आधारे आपली हद्द- समोरच्याची हद्द अशा खुणा केल्या जातात.
काहीशी किचकट असणारी जमीन मोजणीची प्रक्रिया रोव्हर तंत्राद्यानामुळे सुकर होणार आहे. जमिनीची अचूक मोजणी याद्वारे करता येणार आहे. अवघ्या तासाभराच्या कालावधीत आता ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. रोव्हर पद्धतीचा वापर करत आता जमीन मोजणीची दीड लाख प्रकरणे निकालात काढण्यात येणार आहेत. ६० कोटींचा निधी याला मंजूर झाला असून जिल्ह्यांना जमीन मोजणी यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
जमीन मोजणी कशी करतात?
दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.
मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्याची नोंद केली जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. संबंधित रकमेचे चलन बँकेत भारीउन कार्यालयात जमा केल्यानंतर जमीन मोजणीचा महिना आणि तारीख देण्यात येते.
ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत १.५०० या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी १.१००० या परिमाणात तयार होते.
त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.
जमीन मोजण्याची रोव्हर पद्धत काय?
जमिनीची कमी वेळेत आणि अचूक मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ७७ स्थानके उभारली आहेत. या स्थानकांचा थेट संपर्क उपग्रहाशी येतो आणि रोव्हर हे यंत्र आपण सहज शेतात घेऊन जाऊ शकतो. हे यंत्रही उपग्रहाशी जोडलेले असल्याने स्थानकांच्या आधारे जीपीएस मोजणी काही वेळात घेता येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये संकलित करण्यात येते. सध्या जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे पाहता रोव्हर यंत्रांमुळे हे काम सोपे होणार आहे.
रोव्हरमुळे जमीन मोजणीचा वाचणार वेळ
रोव्हर यंत्र उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या लहरी जमीन मोजणीचे अक्षांश रेखांश दाखवते. यावरून संगणकातील यंत्रणेद्वारे मोजणीची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या आधुनिक मोजणी यंत्रणेतून मोजणीकाम सुलभ,अचूक व अत्यंत जलदगतीने होण्यास मदत होते. यापूर्वीचे मोजणी साहित्य सरळ टेबलने साधारण दहा एकर मोजणी करण्यासाठी एक दिवस वेळ लागत असे. तसेच ई.टी.एस यंत्राच्या सहाय्याने तेवढ्याच क्षेत्राच्या मोजणीसाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता ही मोजणी केवळ तासाभरात करता येऊ शकते. रोव्हर खरेदीसाठी मान्यता मिळाल्याने लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे राज्यात पूर्वीचे नऊशे आणि आता नव्याने सहाशे असे सुमारे दीड हजार रोव्हर उपलब्ध होतील.त्यामुळे मोजण्या गतीने होऊन त्या मुदतीत संपतील.