Join us

Jaggery Factory : साखर कारखान्यांच्या महिनाभर आधी गुऱ्हाळांच्या गाळपाचा मुहूर्त! ऊसतोडणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 9:29 PM

Jaggery Factory : राज्यातील सर्वच साखर कारखाने १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून राज्यातील गुऱ्हाळ कारखाने एक महिनाभर आधीच सुरू झाले आहेत.

Jaggery Factory : यंदाचा ऊस गाळप हंगाम तोंडावर आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये साखर गाळप हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यावर एकमत झाले होते. ठरवलेल्या तारखेच्या आधी कारखाने सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाकडून देण्यात आला होता.  त्यानुसार राज्यातील सर्वच साखर कारखाने सुरू होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा वेळ असून गुऱ्हाळ कारखाने मात्र एक महिनाभर आधीच सुरू झाले आहेत.

साखर आयुक्तालयाकडून गाळप हंगाम सुरू करण्यासंदर्भात आणि गाळप हंगाम संपेपर्यंत सर्व कंट्रोलिंग केले जाते. पण गुऱ्हाळघरे किंवा गूळ, गूळ पावडर कारखान्यांचे गाळप सुरू करण्यासंदर्भात साखर आयुक्तालयाचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे राज्यातील प्रत्येक गुऱ्हाळघर आपापल्या सोयीनुसार गाळपाला सुरूवात करते. 

दरम्यान, यंदा राज्यात अजूनही दमदार पाऊस सुरू आहे. तर येणाऱ्या काळातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी सुरू होणारा गाळप हंगाम पुढे ढकलेल अशी शंका आहे. त्याचबरोबर २० नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असल्यामुळे अनेक कारखाने निवडणुकीच्या निकालानंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील उस पट्ट्यातील अनेक गूळ कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. कमी क्षमतेने का असेना पण त्यांच्या गाळपाचा मुहूर्त लागला असून उसतोड कामगारांच्या टोळ्याही गावागावांत यायला सुरूवात झालेली आहे. पण यंदा गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्यामुळे मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे. 

Ethanol Production : इथेनॉल उत्पादन घटले! साखर कारखान्यांकडून उत्पादनात २० कोटी लीटरची तफावत

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेती क्षेत्र