जळगाव जिल्ह्यात मागील २० दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या चौकशी अंती अखेर कृषी विभागाने संबंधित खत कंपनी सरदार अँग्रो फर्टिलायझर प्रा. लिचा परवाना अत्यावश्यक वस्तू कायद्याखाली निलंबित करून शेतकऱ्यांना फसवणुकीपासून दिलासा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
जामनेर तालुक्यातील मोजे तोंडापूर, मोयखेडा दिगर, तोरनाळे इ. १७ गांवातील सुमारे २८४ शेतकऱ्यांनी मे. सरदार अॅग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रा. लि. भालगम, ता. वांकनेर, जि. मोरबी, गुजरात या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर कापूस व इतर पिकांना दिल्यामुळे पाने गोळा होणे, लांबट होणे, अशी विकृती होऊन पिकांची वाढ खुंटलेली असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या.
तक्रारींची घेतली दखल
या तक्रारींची तात्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन सदरील रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.
पंचनाम्यात तपासले नमुने
त्यानंतर मौजे तोंडापूर, ता. जामनेर येथे नुकसानग्रस्त शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, कंपनीचे प्रतिनीधी, खत विक्रेते, व विद्यापिठाचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थीतीत स्थळ पंचनामा करण्यात आला. त्यात मे. सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रा.लि. या कंपनीचे उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर केलेल्या क्षेत्रामध्ये समान विकृती दिसुन आली व ज्या शेतकऱ्यांनी या खताचा वापर केलेला नाही, त्यांच्या पिकात अशा प्रकारच्या विकृतीचे लक्षणे आढळुन आलेली दिसली नाही. त्यामुळे या ठिकाणावरून संशयीत मे. सरदार अँग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रा.लि. या कंपनीचे उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खताचे १४ नमुने घेऊन तपासणीसाठी खत नियंत्रण प्रयोगशाळा, नाशिक / एनआयपिएचएम हैदराबाद येथे पाठवण्यात करण्यात आले होते.
तक्रार निवारण समितीला दिसले असे नुकसान
दिनांक १५/०७/२०२३ रोजी तालुका तक्रार निवारण समितीने मोयखेडा दिगर येथील शेतकरी श्री. इश्वर भगवान सैवारे यांच्या क्षेत्रातील भेटीच्या अहवालामध्ये मे. सरदार अॅग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रा.लि. या कंपनीचे उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर केला असल्याचा समान दुवा आढळुन आला हाता. . त्यामुळे प्रथमदर्शनी सदरचे खत निकृष्ठ दर्जाचे अथवा भेसळयुक्त असण्याची शक्यता वाटले. सदर शेतक-याचे ८५ टक्के आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. त्यानंतर सबंधित विक्रेत्यांकडील शिल्लक साठा १२९.४५ मे.टन विक्री बंद आदेश देण्यात आले.
कृषी विभागाने केले निलंबित
दरम्यान या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालात निष्कर्ष नोंदविला आला. मे. सरदार अँग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रा. लि. या कंपनीने खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ८, १९ (सी) (२) (३), २८ (१) (ए), ३५ (१)(ए) (बी) व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (१), ९ चे उल्लंघन केलेले आढळून आले. त्यामुळे जळगाव येथील मे. सरदार ॲग्रो फर्टिलायझर्स ॲण्ड केमिकल्स प्रा.लि., (गट नं. १८७/१, प्लॉट नं. ५, दत्तामंदीर मार्ग, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा. जि. जळगांव ) या कंपनीच्या उत्पादीत सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालात निष्कर्ष नोंदविला होता. त्यानुसार या कंपनीचा खत विक्रीचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.