Join us

Jalna dagadi Jwari : GI मुळे जालन्याच्या दगडी ज्वारीला मिळतोय दुप्पट दर! पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:20 PM

Jalna dagadi Jwari : पण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या केवळ २० असून ही संख्या वाढणे गरजेचे आहे. कृषी विभागाने आणि जय किसान शेतकरी गटाने नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

Jalna Dagadi Jwari GI Tag: जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आणि अगदी ६ महिन्यातच प्रसिद्धी मिळायला सुरूवात झाली आहे. जीआय मानांकनानंतर मागणीमध्ये वाढ झाली असूून गुणधर्म कळाल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोकं ज्वारीची मागणी करत आहेत. तर यामुळे परंपरागत ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळण्याचा मार्ग तयार झाला आहे. 

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, बदनापूर, जालन्याच्या काही भागांत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दगडी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात हुरड्याच्या ज्वारीचे (मालदांडी किंवा सुरती वाण) उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दगडी ज्वारीला जीआय टॅग मिळाल्यानंतर दुप्पट दराने विक्री होत असल्याचे जय किसान शेतकरी गटाचे अध्यक्ष भगवान मात्रे यांनी सांगितले.  दरम्यान, जालना जिल्ह्यामध्ये या ज्वारीचे उत्पादन घेणारे १० हजारांपेक्षा जास्त शेतकरी आहेत. पण शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करत असल्यामुळे बियाणांतील शुद्धता बिघडत चालली आहे. तर जीआय मानांकनानंतर दगडी ज्वारीचे उत्पादन करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या केवळ २० एवढी आहे. ही संख्या वाढण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करायला पाहिजेत असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

ब्रँडिंग महत्त्वाचीजीआय मानांकन मिळाले म्हणजे त्या उत्पादनाला शाश्वत दर मिळतो असे नाही. शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी उत्पादक संस्थांनी एकत्र येत उत्पादनाची मार्केटिंग करून जीआय मानांकनाखाली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. ब्रँडिंग आणि विक्रीव्यवस्था उभी केली तर आपल्या उत्पादनाला शाश्वत बाजारपेठ मिळू शकते. 

काय आहेत दगडी ज्वारीचे वैशिष्ट्ये?दगडी ज्वारी हे दुष्काळी भागात कमी पाण्यावरही येऊ शकणारे वाण आहे. या वाणाला कोणतेही खत टाकण्याची गरज नसते. केवळ मातीत पेरल्यानंतर ही ज्वारी चांगली येते. या ज्वारीचे ताट मजबूत असल्यामुळे वाऱ्याने ज्वारी पडत नाही. या ज्वारीमध्ये ग्लुटेनचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे ग्लुटेन फ्री डाएट करणाऱ्यांना या ज्वारीचा अन्नात सामावेश करता येतो. या कणसामधील दाणे घट्ट असल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पक्षीही खात नाहीत. पण या ज्वारीचा कडबा जनावरे आवडीने खातात. मधुमेह, लठ्ठपणा या आजारांवर ही ज्वारी फायदेशीर ठरते.

लोकं पारंपारिक पद्धतीनेच शेती करत होते, पण जीआयमुळे त्यांना या वाणाचे गुणधर्म माहिती झाले.  जीआय मानांकनामुळे दगडी ज्वारीची मागणी वाढली आहे. सध्या २५ ते २६ जिल्ह्यांतून ज्वारीची मागणी होत आहे. बाजारात या ज्वारीला २५ ते ३० रूपये किलोचा दर मिळायचा, पण जीआयमुळे आम्ही ६० रूपये किलोप्रमाणे ज्वारीची विक्री करतो.- भगवान मात्रे (जय किसान शेतकरी गट, बदनापूर, जि. जालना) 

टॅग्स :शेती क्षेत्रजिल्हा रुग्णालय जालनाशेतकरी