कोल्हापूर : शासनाने शेतजमीन प्लॉट मोजणी शुल्कात सरासरी दुपटीने केलेल्या वाढीला विधानसभा निवडणुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे जुन्या दरानेच मोजणीची प्रक्रिया भूमी अभिलेख प्रशासनाने सुरू केली आहे.
मात्र, भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम लावल्याने मोजणीची कामे बंद आहेत. अर्ज दाखल करण्याची ऑनलाइन यंत्रणाही बंद आहे. परिणामी शेतजमीन, प्लॉट मोजणी करून घेणाऱ्यांची कोंडी झाली आहे.
पण, आता जुन्या दराने ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे आदेश जिल्हा भूमी अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. साधी, तातडीची, अतितातडीची असे मोजणीत तीन प्रकार आहेत. मात्र, या तीन सुविधांऐवजी साधी आणि जलदगतीची मोजणी असे दोनच प्रकार शासनाने केले.
मोजणीचे दरही दुपटीहून अधिक केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शासनाने लोकप्रिय घोषणा केल्याने मोजणीचे दर वाढवले, अशीही टीका झाली. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामुळे नवीन दरवाढ आणि सुधारित पद्धतीला स्थगिती देण्यात आली आहे.
ऑनलाइन सिस्टममध्येही बदल नाही
मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. नव्या आदेशात केवळ साधी आणि जलद गतीने मोजणी असे दोनच प्रकार केले. पण, ऑनलाइन सिस्टममध्ये बदल केला नाही. परिणामी, सुधारित दराची अंमलबजावणीच झाली नाही.
अजून रद्द नाही
• शेतजमीन साधी मोजणीचे दर दोन हेक्टरपर्यंत एक हजार आहे; पण नव्या आदेशात यामध्ये वाढ करून दोन हजार रुपये केली आहे. जलदगती मोजणीचे दर तीन हजार आहेत. यामध्ये वाढ करून आठ हजार रुपये केले आहेत.
• सध्या तरी नवीन दराला आणि नव्या पद्धतीच्या अंमलबजावणीला शासनाने स्थगिती दिली आहे. पण, नवीन आदेश रद्द केलेला नाही. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लागू होण्याचीही शक्यता आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मोजणीच्या नवीन दराचे परिपत्रक आले आहे. यामध्ये मोजणीचे दोनच प्रकार केले आहेत. पण, याच्या अंमलबजावणीत अडचणी आहेत. म्हणून सध्या जुन्या दरानेच मोजणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, सध्या भूमी अभिलेखचे अनेक कर्मचारी निवडणूक कामात आहेत. परिणामी मोजणीच्या कामांना अपेक्षित गती नाही. - शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर
अधिक वाचा: Adsali Sugarcane : आडसाली उसातील संजीकांच्या फवारण्या कधी व कशा कराव्यात वाचा सविस्तर