नितीन चौधरीपुणे : राज्यात जमिनींच्या मोजणीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ई-मोजणी 'व्हर्जन २'मुळे मोजणीला वेग आला आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३९ हजारांहून अधिक विक्रमी मोजणी झाल्या आहेत. हा आजवरचा विक्रम आहे.
तर जानेवारी ते १० एप्रिलपर्यंत ६३ हजार मोजणी पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील सुमारे अडीचशेहून अधिक तालुक्यांमध्ये आता मोजणीला ६० दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत नाही.
तर मोजणींच्या संख्या अधिक असलेल्या १३ तालुक्यांमध्ये हा कालावधी ९० दिवसांच्या आत आणला असल्याची माहिती भूमिअभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
भूमिअभिलेख विभागाने ई-मोजणी 'व्हर्जन २.०' हे अद्ययावत तंत्रज्ञान आणले आहे. सबंध राज्यात ही प्रणाली १ जानेवारीपासून अमलात आली आहे.
या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जमिनीचे ठिकाण, अक्षांश, रेखांश नकाशाच्या 'क' प्रतवर उपलब्ध होत आहे. अक्षांश, रेखांशाच्या आधारे जमिनीच्या हद्दी निश्चित करणे शक्य झाले आहे.
तसेच पोटहिस्सा मोजणीची नकाशात नोंद होणे आणि सातबारा अभिलेखात दुरुस्ती होत आहे. त्यामुळे, मोजणी होताच त्या जागेचा नकाशा आणि स्वतंत्र अद्ययावत सातबारा मिळत आहे.
नागरिकांना ऑनलाइनच नकाशा आणि सातबारा उपलब्ध होईल. तर नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात येऊन मूळ नकाशांचे उपनकाशे तयार केले. नकाशा आणि सातबारामधील जमिनींच्या क्षेत्राचा ताळमेळ घालण्यात आला.
६३ हजार मोजणी पूर्ण◼️ दरम्यान, राज्यात ३१ डिसेंबरअखेर एकूण ८८ हजार २४ जमीन मोजणी प्रकरणे होती. त्यापैकी ३१ मार्चअखेर ६३ हजार १४ मोजणी पूर्ण झाली आहे. हे काम एकूण प्रकरणांच्या सुमारे ७२ टक्के आहे.◼️ उर्वरित २५ हजार १० प्रकरणे २१ एप्रिलपर्यंत १०० टक्के निकाली काढण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती भूमिअभिलेख उपसंचालक (भूमापन) कमलाकर हट्टेकर यांनी दिली.◼️ जमीन मोजणीसाठी राज्य सरकारने विहित केलेला कालावधी २० दिवसांचा आहे.◼️ मात्र, मोजणीचा वेग वाढल्याने आता राज्यातील २५५ तालुक्यांमध्ये मोजणी ६० दिवसांच्या आतच होत आहे.◼️ तर १३ तालुक्यांमध्ये मोजणी प्रकरणांची संख्या जास्त असल्याने मोजणीचा कालावधी ९० दिवसांवर आला आहे. हा कालावधीही ६० दिवसांपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे.◼️ हे १३ तालुके पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील असल्याची माहितीही दिवसे यांनी दिली.◼️ यापूर्वी दरमहा मोजणी प्रकरणांची संख्या सरासरी २१ हजार इतकी होती.◼️ मात्र, केवळ मार्च महिन्यात राज्यात तब्बल ३९ हजार ६०० मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आल्या आहेत. हा एक विक्रमच आहे, असेही त्यांनी सांगितले.◼️ तसेच ई मोजणी 'व्हर्जन-२'मुळेही मोजणीचा वेग वाढला आहे. मोजणीबाबत काढलेल्या दोन परिपत्रकांमुळेही सुसूत्रता आली आहे.
मोजणीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे उपस्थितीचे प्रमाण आता ६० टक्क्यांवरून ८० टक्के झाले आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी मोजणी कर्मचाऱ्याला बदली कर्मचारी देण्यात येत आहे. त्यामुळे मोजणीचे वेळापत्रक पाळले जाईल. - डॉ. सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमिअभिलेख संचालक
अधिक वाचा: शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर