छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून ७०० कोटी रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील विविध धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम (एमआयआयपी) ही पंचवार्षिक योजना आणली आहे. यात जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी दुसऱ्या टप्प्यात ७०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, असा सुमारे २०८ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ४४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली आहे. या कालव्याची मागील ४५ वर्षांत दुरूस्ती झाली नाही. परिणामी, कालव्यात आणि कालव्यावर ठिकठिकाणी झाडी, झुडपे उगवली. एवढेच नव्हे तर कालव्याचा सरफेस उखडला आहे.
परिणामी, कालव्याची पाणी वहन क्षमता ५० टक्के कमी झाली आहे. जायकवाडीतून सिंचनासाठी २० दिवसांच्या एका आवर्तनास आता सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागतो. ही बाब लक्षात घेऊन डाव्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीची दखल घेत दीड वर्षापूर्वी डाव्या कालव्याचे सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हा डावा कालवा आणि त्याच्या मुख्य आणि उपवितरिकांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल सुचविण्यात आला. इरिगेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राममध्ये जायकवाडीसाठी दुसऱ्या टप्प्यात ७०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे
जायकवाडीच्या सिंचनाचा सुमारे ७५ टक्के भार उचलणाऱ्या डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी पाण्याची वहन क्षमता घटली. यामुळे कालवा दुरुस्ती गरजेची आहे. महाराष्ट्र इरिगेशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्रामअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७०० कोटी रुपये मिळणार आहेत. - जयंत गवळी, मुख्य अभियंता, कडा
हेही वाचा : Women Farmer Success Story : कुटुंबाच्या मदतीने संगीताताईंची फळ प्रक्रिया उद्योगात भरारी