महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी आणि एकूणच शेतकरी बांधवांच्या उर्जितावस्थेसाठी चारही कृषी विद्यापीठे करीत असलेल्या निरंतर संशोधनामुळे मोलाचा हातभार लागला असून यामुळे हवामान बदलाच्या काळात भविष्यातील शाश्वत स्वरूपाच्या शेतीच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात भरीव संशोधनाची आवश्यकता अधोरेखित होते.
कृषी विद्यापीठांद्वारे करण्यात येत असलेल्या विविध महत्वपूर्ण बाबींवरील संशोधनाद्वारेच राज्यातील कृषी क्षेत्र आज सक्षम झाल्याचे पाहावयास मिळत असून शेतकरी बांधवांच्या विकासाची मूहूर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवल्या जावून राज्यातील विकासाची पायाभरणी झाली असे मोलाचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यानी केले.
महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्र व शेतकरी बांधवांसाठी पिकांचे अधिक उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारित वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे आणि एकूणच पिकांच्या उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारसींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीचा समारोप दिनांक ९ जून २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात उत्साहात संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संबोधित होते.
याप्रसंगी, गत दोन दिवसात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध तांत्रिक सत्रांमध्ये गटनिहाय संपन्न झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व गुणवत्ता तसेच सखोल विचार मंथनातून पिकांचे सुधारित नवीन आशादायक वाण, शेतकऱ्यांच्या वेळेची व श्रमाची बचत करणारी सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषी तंत्रज्ञान विषयक शिफारशींना अंतिम मान्यता प्रदान करण्यात येवून शिक्कामोर्तब करण्यात आले.
सदर महत्वपूर्ण बैठकीमध्ये राज्यातील एकूण चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तथा २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञांना मंजुरी मिळाली असून सदर संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर समारोपीय सत्राचे सहअध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आपल्या संबोधनांमध्ये सदर बैठकीच्या संक्षिप्त आढावा विशद करताना या बैठकीमुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध सलाग्नित संस्थांमध्ये चांगला समन्वय घडून आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढे संबोधताना त्यांनी विविध तांत्रिक सत्रा दरम्यान बारा गटांतर्गत संपन्न झालेले एकूण शिफारशींचे सादरीकरण, मान्यता प्रदान करण्यात आलेले नवीन पिक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे आणि पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त अशा तंत्रज्ञानात्मक एकूण शिफारसीं संदर्भात आनंद व्यक्त केला.
त्याचप्रमाणे भविष्यातील कृषी संशोधनाची दिशा तसेच कृषी संशोधन शेतकरीभिमुख असण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित करण्यासोबतच विभाग निहाय संशोधनाचा आराखडा तयार करण्यावर, आर्थिक विश्लेषणाचा अभ्यास करण्यावर तसेच विस्तार कार्य प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला.
तसेच समारोपीय सत्राचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी आपल्या संबोधनांमध्ये सदर संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठकीचा कालावधी वाढवण्याची गरज प्रतिपादित करून शेती संदर्भातील पारंपारिक ज्ञान व पद्धतीमध्ये मिश्रणाची आवश्यकता अधोरेखित केली. पुढे संबोधकांना त्यांनी शेती शेतकऱ्यांची शेती ही महत्त्वाची प्रयोगशाळा असून कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेऊन त्यावर काळानुरूप उपाय योजना सुचवणे गरजेचे असून संशोधन शेतकरी बांधवांना अनुकूल असण्यावर भर दिला. परिणामी, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार नेमके संशोधन होऊन शाश्वत शेती कृतीत येईल असा आशावाद देखील व्यक्त केला.
सदर समारोपीय सत्राचे प्रसंगी सह-अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. शरद गडाख तथा कुलगुरू डॉ. संजय भावे यांची विशेष उपस्थिती होती. तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संशोधन संचालक यांसह महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशीद यांची देखील विचारमंचावर उपस्थिती होती.
अध्यक्षांचे मान्यतेने एकूण बारा ही ग्रुप मधील संयोजकांनी संबंधित विभागातील मंजूर झालेल्या पिकवाण, शिफारसी तथा इतर उपलब्धीचे अनुक्रमे डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. व्ही. एल. आमोलिक, डॉ. ए. एन. पसलावार, डॉ.अरविंद सोनकांबळे, डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. एस. व्ही. दिवेकर, डॉ. अनिल कोल्हे, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. निशांत शेंडे, डॉ. रामभाऊ घोराडे, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. ताराचंद राठोड आदींनी सादरीकरण केले.
या समारोपीय सत्राचे प्रसंगी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊ घातलेल्या शास्त्रज्ञांचा मान्यवरांचे शुभहस्ते भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन यजमान संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले.
दरम्यान पुढील वर्षी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे (जॉईंट अॅग्रोस्कोचे) यजमानपद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडे असल्याने विद्यमान यजमान अकोला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांना नारळ देत संयुक्तरीत्या हस्तांतरित केले. राष्ट्रगीताने अतिशय महत्त्वाकांक्षी ५२ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे समापन झाले.