महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत ६०-७० च्या दशकात महत्त्वाचे स्थान असलेल्या ज्वारीचा आता शहरी भागात काही प्रमाणात पुन्हा आहारात समावेश होऊ लागला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या 'सुपर फूड'चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात.
ज्वारीचा इतिहास रंजक आहे. साधारण पाच हजार वर्षांपासून ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचा उगम आफ्रिकेत झाला. तेथून ती भारत, चीनमध्ये आली. अमेरिका आफ्रिकेतून गुलामांचा व्यापार करायची.
गुलामांबरोबर ज्वारीही अमेरिकेत पोहोचली. गरिबांचे मुख्य अन्न म्हणून एकेकाळी ज्वारीकडे पाहिले जायचे. मात्र रेशनवर गहू, तांदूळ यांचा पुरवठा सुरू झाल्याने आहारातील ज्वारीचे स्थान कमी झाले.
१९६० पर्यंत महाराष्ट्रात सुमारे ६२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घेतले जायचे. १९८० पर्यंत मोठ्या प्रमाणात ज्वारीची शेती होती. मात्र त्यानंतर विशेषतः जागतिकीकरणानंतर ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत गेले.
गेल्या ५० वर्षांत ज्वारीचे क्षेत्र घटून ते १७ लाख ४० हजार हेक्टरवर आले आहे. वाढता खर्च आणि २० ते ३० रुपये प्रतिकिलोच्या पुढे भाव मिळत नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले. शेतकरी आता केवळ रब्बी ज्वारीला पसंती देतात.
आरोग्यवर्धक 'ज्वारी'
१. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आहेत, त्यामुळे हाडांची मजबुती वाढणे, रक्त्त वाढवण्यासाठी ती उपयोगी आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ती आरोग्यवर्धक आहे.
२. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. ते पचण्यासाठी, पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
३. पोटामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची निर्मिती करते. ज्वारी खाण्याने आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते.
ज्वारीचे कोठार सोलापूर
• सोलापूरला 'ज्वारीचे कोठार' म्हटले जाते. मात्र तेथेही आता ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.
• मालदांडी ज्वारीला ४० ते ५० रुपये किलो भाव मिळतो.
• संयुक्त राष्ट्र महासभेने २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' (मिलेट इयर) जाहीर केले. केंद्र सरकारने भरडधान्याचे उत्पादन वाढविण्यापासून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात विशेष काही झाले नाही.
• भरडधान्यांत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, आदींचा समावेश होतो. हे पीक उष्णकटिबंधीय आहे. यास पाणीही कमी लागते.
गोदावरी नदी आणि ज्वारी
• मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांना 'गंगाथडी' म्हटले जायचे. हा परिसर ज्वारीसाठी प्रसिद्ध होता. मात्र ज्वारीच्या भावाचे गणित बिघडल्याने येथील काही शेतकरी आता सोयाबीन तसेच उसाच्या पिकाकडे वळले आहेत.
• ज्वारीचे पीक कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात घेतले जाते. पावसानंतर ओलसर जमिनीत रब्बीचे पीक चांगले येते.
ज्वारीचे अर्थकारण
शेतकऱ्यांच्या ज्वारीला कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा स्थानिक बाजारात केवळ २० ते ३० रुपये किलो भाव मिळतो. मात्र शहरात ग्राहकाला ज्वारी ६० रुपये किलोने घ्यावी लागते. ज्वारीच्या काढणीसाठी मजुरांचा खर्च आता वाढला आहे. त्यामुळे भावाअभावी हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाही.
ज्वारीमुळे शरीरातील चरबी, साखर नियंत्रणात राहते. मधुमेही, उच्च रक्तदाब, अधिक वजनाच्या व्यक्ती, थायरॉइडचे रुग्ण यांच्यासाठी ज्वारी फायदेशीर आहे. मुख्यत्वे ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. मात्र ज्वारीपासून घावन, धिरडे, इडली, खिचडी किंवा गूळ घातलेली पेज केली जाते. - डॉ. शीतल नागरे, आहारतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे.
१९९० पर्यंत लागवड आणि उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. मात्र इतर नगदी पिकांमध्ये पैसा मिळू लागला. दुसरीकडे, साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने ज्वारीऐवजी शेतकरी उसाचे पीक घेऊ लागले. तशी ज्वारीच्या घसरणीची कहाणी सुरू झाली. लागवड, उत्पादन, बाजारभाव, प्रक्रिया उद्योग आणि साठवण व्यवस्था अशा कोणत्याही बाबतीत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे ज्वारीच्या मूल्य साखळी व्यवस्थेतही घसरण झाली. परिणामी ज्वारीला पर्याय म्हणून हरभरा आणि घेवडा या पिकांचा विचार शेतकरी करत आहेत. - डॉ. सोमिनाथ घोळवे, शेती प्रश्नांचे अभ्यासक.
योगेश बिडवई
मुख्य उपसंपादक.