हैदराबादचा बेंगनपल्ली आंबा देसाईगंज शहरातील बाजारात दाखल झाला आहे. यावर्षी आब्यांचे पीक चांगले असल्याने बेंगनपल्ली आंबा प्रतिकिलो १६० रुपये आहे, तर मागील वर्षी हाच आंबा सुरुवातीला २०० रुपये प्रतिकिलो होता. एवढ्या लवकर आंबा बाजारात दाखल झाल्याने आंब्याच्या दर्जाबाबत लोकांच्या मनात साशंक भावना आहे.
देसाईगंजातील व्यापारी आंबा प्रामुख्याने नागपूर किंवा तेलंगणा राज्यातून आणतात. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हैदराबादी बेंगनपल्ली आंबा बाजारात दाखल झाला आहे. मागील वर्षी या आंब्यांची किंमत प्रतिकिलो २०० रुपये होईल.
यावर्षी मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच १६० रुपये प्रतिकिलोच्या दराने आंबा मिळत आहे. शहरातील काही व्यापारी तेलंगणातील बगिचामध्ये जाऊन कच्चे आंबे खरेदी करतात. बाजारात अजूनही गावठी आंबा आलेला नाही. यावर्षी आंब्याच्या झाडावरील लगडलेली आंबे बघता बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी शहरातील बाजारात दशहरी, बेंगनपल्ली, केशर, लंगडा आंबा विक्रीसाठी लवकर येतो. गावठी आंबे अजूनही बाजारात आली नाही. हे आंबे बाजारात येण्यासाठी पुन्हा २० ते २५ दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत तेलंगणातून विविध प्रजातींच्या आंब्याची आवक वाढणार आहे. परंतु हे आंबे शुद्ध किती हा प्रश्न ग्राहकांना पडत असल्याचे दिसून येते.
रासायनिक प्रक्रिया करून पिकविलेली फळे आयोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहेत. एका संशोधनानुसार कॅन्सरसारख्या घातक रोगाची भीतीदेखील आहे. त्यामुळे बाजारातून कोणते फळ खावे हेच समजत नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून फळांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. - डॉ. प्रणय कोसे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज जिल्हा गडचिरोली
कृत्रिम रसायनांचा वापर वाढला
• आंबा, टरबूज, संत्री, पपई ही फळे घरी लहान मुलांसाठी खरेदी करतात. व्यापारी जादा पैशाच्या हव्यासापोटी राजरोसपणे कार्बाईडसारखे रसायन फळ पिकविण्यासाठी वापरतात. अशाच पद्धतीने रासायनिक प्रक्रिया करून आंबा पिकविला जातो. आंबा दिसायला पिवळा रसरसीत असला तरी त्याच्या दर्जाबाबत ग्राहकांच्या मनात शंका आहे.
• कृत्रिम रसायनाद्वारे आंबे पिकविली जातात. ही आंबे खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तरी सुद्धा अनेकजण ते खातात.
नैसर्गिक पिकविलेला आंबा कसा ओळखायचा
• नैसर्गिकरित्या पिकविलेला आंब्याचा रंग फिकट असतो तसेच त्यावर सुकृत्या असतात. त्याउलट रासायनिक प्रक्रियेतून पिकविलेला आंबा हा गडद रंगाचा असतो तसेच त्याची चमक अधिक असते.
• पारंपरिक पिकविलेला आंबा हा चवीला गोड आंबट अशा दोन चविंचा असतो मात्र रासायनिक पिकविलेला आंबा हा कमी गोड किंवा अधिक गोड अशा प्रमाणात असतो.