नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भरत जाधव यांच्या आंबाच्या बागेत आगळीवेगळी दोन आंब्याची झाडे आढळून आली आहेत.
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत या झाडावर संशोधन करून भरत जाधव यांनी आंबा वाणाला 'जुन्नर गोल्ड' असे नामकरण करून शेतकरी पीक जाती संरक्षण कायद्यांतर्गत या वाणाच्या पेटंट नोंदणीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
जर या वाणाला पेटंट मिळाले तर शिवनेरी हापूसनंतर जुन्नर तालुक्यातील 'जुन्नर गोल्ड' आंबा प्रसिद्ध होणार आहे. नामांतरित 'जुन्नर गोल्ड' हा वाण राजापुरी वाणासारखा दिसणारा आहे.
Junnar Gold Mango त्याचे वजन ८०० ते १००० ग्रॅम आहे. कोयीचे वजन ४० ते ५० ग्रॅम आहे. या आंब्याला हापूस केसर आणि राजापुरी वाणमिश्रित स्वाद आहे.
शेतकरी भरत जाधव यांनी या आंब्याच्या वाणाचे 'जुन्नर गोल्ड' असे नामकरण करून शेतकरी पीकजाती संरक्षण कायद्यांतर्गत या वाणाला पेटंट मिळण्यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रस्ताव पाठविला आहे.
आंबा हंगाम संपुष्टात आला असताना उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी सन २०२४ रोजी भरत जाधव यांच्या आंबा बागेस भेट दिली. त्यावेळी शिरसाठ यांना जाधव यांच्या बागेत नवीन पद्धतीचा विकसित झालेला आंब्याचा नवा वाण पाहावयास मिळाला.
यानंतर वैशिष्ट्यपूर्ण वाणाची पाहणी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल तात्या मेहेर व अन्य काही अधिकारी यांनी केली.
तज्ज्ञ भरत टेमकर व पीकसंरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी बागेतील दोन्ही झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून जाधव यांच्या नावाने नवी दिल्ली येथील 'प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अॅड फार्मर्स राइट्स ऑथॉरिटी कडे पेटंटसाठी प्रस्ताव पाठविला.
फळाची वैशिष्ट्ये
दरवर्षी फळधारणा होते. वजन सरासरी ८०० ते ९०० ग्रॅम असते, तर काही फळांचे वजन १ किलोपर्यंत भरले आहे. फळाचा रंग बाहेरून पिवळा व आतून केशरी आहे. चव हापूस केशर व राजापुरीसंमिश्र असून अन्य वैशिष्ट्येही अहवालात नमूद केली आहेत.
पाहणीसाठी लखनौची टीम
कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रस्ताव पाठविला असून, दिल्ली येथून लखनौ विद्यापीठ येथे हा प्रस्ताव तपासणीसाठी पाठविला आहे. सध्या ही झाडे कणी अवस्थेत असल्याने काही दिवसांतच लखनौमधील टीम झाडे पाहण्यासाठी येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर