पुणे : पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत असून जनावरांवरील आणि माणसांवरील हल्लेही वाढले आहेत. नारायणगाव येथील एका शेतकऱ्याचे जवळपास सात जनावरे आणि चार कुत्रे बिबट्याने हल्ला करून ठार केले. तर आळे येथील तीन वर्षाच्या चिमुकल्याला ठार केल्यानंतर वनविभागाला जाग आली असून त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि पाळीव प्राण्यांच्या संरक्षणामुळे नागरिकांना रात्रभर जागून पाळीव प्राण्यांची राखण करावी लागत आहे.
दरम्यान, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २००० सालापासून बिबट्याच्या हल्ल्यांत ४१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मागच्या दोन वर्षांचा विचार केला तर ७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती वनविभागाकडून मिळाली आहे. तर कित्येक जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
बिबट्याचा वावर आढळल्यास परिसरातील नागरिकांकडून वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी करण्यात येते पण वनविभागाकडून पिंजरे कमी असल्याचं उत्तर देण्यात येत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागत आहे. पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्यानंतर वनविभागाकडून भरपाईही देण्यात येते पण हल्ला झालेल्या प्राण्याचं शरीर मिळालं नाही तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.
जुन्नर तालुक्यातील नारायणगावपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वारूळवाडी येथील निंबारकर वस्तीवरील तब्बल ७ जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. तर त्यांचे ४ पाळीव कुत्रेही बिबट्याने ठार केले असून आत्माराम निंबारकर, अमोल निंबारकर, तुकाराम निंबारकर आणि त्यांचे कुटुंबीय रात्रभर जागता पहारा ठेवून जनावरांची राखण करत आहेत. अनेकदा त्यांच्या डोळ्यासमोर बिबट्याने जनावरांवर हल्ला केलाय. तर त्यांना आत्तापर्यंत फक्त एका वासराला वाचवण्यात यश आलं आहे.
नागरिकांचा संतापनागरिकांनी मागणी करूनही वनविभागाकडून पिंजरा लावण्यास दिरंगाई करण्यात येते. त्यामुळे पाळीव प्राण्यावरील हल्ले वाढले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना दिवसाही शेतात काम करावे लागते तर रात्रीही जागे राहावे लागत आहे. एवढा त्रास सहन करूनही वनविभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
वनविभागाकडून काय उपाययोजना ?वनविभागाकडून नागरिकांनी बिबट्यापासून बचावासाठी बिबट जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्या माध्यमातून पाळीव प्राणी असतील त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, शेतात जाताना हातात काठी आणि रात्रीच्या वेळी बॅटरी नेणे, शेतात वाकून काम न करणे अशा सूचना करण्यात येतात. तर आपल्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या भक्ष्यावर बिबट्या हल्ला करतो त्यामुळे कमी उंचीच्या प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येते.
या परिसरातील बिबट्यांची संख्या का वाढलीये?
मागच्या दोन दशकांपासून बिबट्यांचा अधिवासामध्ये बदल झाला आहे. मानवाने मोठ्या प्रमाणावर जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे आणि उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे त्यांना उसाचे क्षेत्र सुरक्षित वाटू लागले आहे. या कारणांमुळे त्यांचा उसाच्या परिसरामधील अधिवास वाढत आहे. या परिसरामध्ये ज्या मादीला पिल्ले होतात ते पिल्ले याच वातावरणात मोठे होतात आणि ते इथल्याच प्राण्यांचा भक्ष्य म्हणून वापर करतात.
त्याचबरोबर २००० सालाच्या आसपास सह्याद्रीच्या घाटामध्ये चिलेवाडी आणि पिंपळगाव जोगा धरणांचे बांधकाम सुरू झाले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. बांधकामासाठी लोकांचा वावर आणि मशिनरींच्या आवाजामुळे बिबटे जंगलातून शेताच्या परिसरात आले आणि प्रजननानंतर त्यांची वाढही याच ठिकाणी झाली. त्यांना उसाच्या शेतीमध्ये लपण्यासाठी आणि सहज भक्ष्याची सोय होत असल्यामुळे त्यांनी आता हा अधिवास कायमचा केला असल्याचं मत लोकमतचे प्रतिनिधी सचिन कांकरिया यांनी व्यक्त केलं आहे.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेले व्यक्ती (२००० सालापासून)
- २००१-०२ -- ६
- २००२-०३ -- ११
- २००३-०४ -- १
- २००४-०५ -- ०
- २००५-०६ -- ०
- २००६-०७ -- ०
- २००७-०८ -- १
- २००८-०९ -- १
- २००९-१० -- ०
- २०१०-११ -- ३
- २०११-१२ -- ०
- २०१२-१३ -- ०
- २०१३-१४ -- ०
- २०१४-१५ -- १
- २०१५-१६ -- ४
- २०१६-१७ -- १
- २०१७-१८ -- १
- २०१८-१९ -- २
- २०१९-२० -- १
- २०२०-२१ -- ०
- २०२१-२२ -- १
- २०२२-२३ -- ५
- २०२३-२४ (३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत) - २
मागच्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. आमच्या परिसरातील अनेक शेळ्या, गायीचे वासरे, कुत्रे, कालवडी यांच्यावर हल्ला करून बिबट्याने ठार केले आहेत. आम्ही वारंवार या परिसरात पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी करत आहोत. पण वनविभागाकडून दिरंगाई केली जाते आणि पिंजरे कमी असल्याचे कारणे दिले जातात. आमचे एवढे जनावरे खाऊनही या ठिकाणी अजून पिंजरा लावण्यात आलेला नाही. - विवेक निंबारकर (शेतकरी, नारायणगाव)
बिबट्याने कोंडलेल्या शेळ्यांवरही हल्ला केला असून दोन बोकडे, तीन शेळ्या, वासरे, कालवडी आणि कुत्रे नेल्यामुळे आम्ही रात्रभर जागून जनावरांची राखण करतो. एक वासरू आम्ही बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवलं आहे. त्याच्या उपचाराचा खर्चसुद्धा आम्हालाच करावा लागला असून आत्तापर्यंत फक्त दोन जनावरांची मदत आम्हाला वनविभागाकडून मिळाली आहे. एखाद्या जनावरांना बिबट्याने नेले आणि त्याचा पुरावा नाही मिळाला तर भरपाईसुद्धा मिळत नाही. - आत्माराम निंबारकर (शेतकरी, वारूळवाडी, नारायणगाव)
जुन्नर आणि आजूबाजूचा परिसर बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. वनविभागाकडून वेळोवेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जनजागृती केली जाते. पण तरीही बिबट्याचा वावर त्या परिसरात आढळला तर वनविभागाकडून घटनास्थळी भेट देऊन आवश्यकतेनुसार पिंजऱ्याची मागणी करण्यात येते. पण सध्या आमच्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी आहे. एखाद्या ठिकाणी पिंजरा लावायचा असल्यास घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनविभागाच्या मुख्य कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. एखाद्या प्राण्यावर बिबट्याने हल्ला केला असेल तर आम्ही घटनेचा पंचनामा करतो आणि योग्य ती कार्यवाही करून सदर नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येते. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा आवाहनही आम्ही वेळोवेळी करत असतो.
- ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक, नारायणगाव (वनविभाग जुन्नर)