किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात ९ व १० जून रोजी झालेल्या पावसावर परिसरात कापूस पिकांची लागवड केली. तेव्हापासून पावसाचा अनियमिततेचा खेळ पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे. दररोज ढगांची गर्दी होते; पण पाऊसच होत नाही.
गेल्या दहा दिवसापासून या बर परिसरात पावसाचा पत्ताच नाही. पाऊस येईल या आशेवर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या परिसरात १०० टक्के पेरणी झाली असून पावसाअभावी पीक मोडण्याची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हा परिसर कोरडवाहू असल्याने पावसाच्या पाण्यावरची पिके घेतली जातात. जर पेरणीला उशीर झाला तर सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला नाही तर, कोरडवाहू शेती हातून जात असल्याचे गेल्या दोन-तीन वर्षाचे चित्र असल्याने या परिसरातील शेतकरी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसावरच पेरणी हातात घेतात.
शिवणी येथील शेतकरी गोवर्धन पालोलू यांनी सांगितले, माझी जमीन कमी असल्याने मी दुसऱ्याची जमीन बटाईने करतो. माझ्या शेतीत गेल्या १० जून रोजी कापसाची लागवड केली. तेव्हापासून पाऊस नसल्याने व उन्हाच्या तडाख्याने पावसानंतरही पिकांची उगवून होईल, याची शाश्वती नाही. अगोदरच ११ बॅग कापूस व ४ बेंग सोयाबीन खते असा एकूण २५ हजारांचा खर्च झाला असून उसनवारी करून पेरणी करण्याशिवाय पर्याय नाही.
६८ मि.मी. पावसाच्या भरवशावर पेरण्या !
लोकमत न्यूज नेटवर्क किनवट तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. केवळ ६८ मि.मी. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना वेग दिला आहे. त्यामुळे यापुढे पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती कायम आहे.
तालुक्यात आजपर्यंत केवळ ६८ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री सर्वदूर २३ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी मंगळवारी वेग दिला. जो तो शेतकरी पेरणीकडे वळला असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
खताचा नाही तुटवडा
तालुक्यात सध्या खताचा तुटवडा नाही. डीएपी आणि १०:२६:२६ या खतांची मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी एकाच खताचा आग्रह करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मंडे यांनी केले आहे.