Join us

मराठवाड्यात ज्वारी काढणीला वेग; काही शेतकऱ्यांचा झालेला खर्चही पदरात पडणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 2:03 PM

उत्पादनात घट; त्यातच खर्चही वाढला

आंबी : ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भूम तालुक्यातील आंबी व परिसरामध्ये सध्या रखरखत्या उन्हात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे. परंतु, पुरेशा पाण्याअभावी उत्पादनात झालेली घट, शिवाय वाढलेला उत्पादन खर्च यामुळे आजवर झालेला खर्चही पदरात पडतो की नाही, अशी चिंता शेतक-यांमधून व्यक्त होत आहे.

आंबी परिसरात ज्वारी काढणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे. परिणामी, दिवसा आणि रात्रीदेखील ज्वारी काढणीची कामे सुरू आहेत. परंतु, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. दिवसासाठी महिलांना ४५० आणि पुरुषांना ६०० रुपये तर रात्रीच्या चार तासांसाठी महिला मजुरांना चारशे तर पुरुषांना साडेपाचशे रुपये मजुरी दिली जातेय. याशिवाय, मजुरांची ने-आण करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये गाडीभाड्याचा खर्च, काढलेली ज्वारी कापणे, पेंढ्या बांधणे, कणसे गोळा करणे याप्रमाणे एकरभर ज्वारी काढणीतच शेतकऱ्यांना जवळपास सात-आठ हजार रुपयांचा खर्च करावा लागतो.

एवढे करूनही पावसाने साथ दिली तर चांगल्या जमिनीत एका एकरात साधारण आठ ते नऊ क्विंटल याप्रमाणे उतार मिळतो. शेतकऱ्याला ज्वारी पेरणीपासून ते काढून आडतीला नेईपर्यंत साधारण खर्च २५ हजार रुपयांच्या घरात येत असल्याने त्या तुलनेत चांगला दर मिळणे अपेक्षित असते. परंतु, सध्याचा चार हजार रुपये दर गृहीत धरला तरी चांगली जमीन असलेल्या शेतकऱ्यांना साधारण आठ- नऊ क्विंटल उतार याप्रमाणे ३०-३५ हजारांच्या आसपास रक्कम हाती पडते. परंतु, सर्वसाधारण किंवा कोरडवाहू जमीन असणाऱ्या किंवा पुरेशा पाण्याची उपलब्धता नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र हे पीक आतबट्ट्याचे ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आता बदलत चालला आहे.

यावर्षी अवकाळी पाऊस पडल्यामुळे ज्वारीचे पीक चांगले आले, परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा ज्वारीसाठी पाण्याची गरज होती तेव्हा पाणी मिळाले नाही. परिणामी, ज्वारीला उतार कमी पडत असून, यातून काढणीचा खर्चही निघणार नाही.- अमोल गटकळ, शेतकरी, आंबी

शेतीच्या जीवावर जगणे मुश्कील झाले आहे. कांद्याला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. शेतीवर कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे अवघड झाले आहे.- सुजीत गटकळ, शेतकरी, आंबी

शेती विकून बँकेत पैसे टाकून त्या पैशाला मिळणाऱ्या व्याजाची रक्कमही आताच्या उत्पन्नापेक्षा जास्त येऊ शकते. त्यामुळे बऱ्याच वेळेस असा शेती विकून पैसे बँकेत टाकावेत असा विचार मनात येतो.- रवींद्र गलांडे, शेतकरी, आंबी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी