शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील कांदाकाढणी जोरात सुरू आहे. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
दररोज ढगाळ वातावरण राहत आहे. तर काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी १५ रुपये प्रतिकिलो असणारा बाजारभाव दहा ते बारा रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकरी चाळीत कांदा साठवू लागले आहेत.
मागील काही वर्षापासून चाळीत ठेवलेल्या कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा कल कांदा चाळीत ठेवण्याकडे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदाचाळी बनवण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे.
कांदाचाळ बनविणाऱ्या कारागिरांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. २५ टनसाठी कांदाचाळ बनविण्यासाठी साधारणपणे ३ लाख रुपये खर्च येत असला तरी कांदाचाळ बनविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
उन्हाचा वाढलेला पारा त्यात दररोज आभाळ येत असल्याने असह्य असा उकाडा जाणवत आहे. त्यात दिवसभर शेतात काम करणे जिकरीचे झाले आहे.
एकाचवेळी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू केल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा काढणीअभावी तसाच शेतात पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२५ टन कांदाचाळ बनविण्यासाठी ३ लाख रुपये खर्चकांदाचाळ बनविणाऱ्या कारागिरांना मोठी मागणी वाढली आहे. कांदाचाळ बनविण्यासाठी ३ लाख खर्च येत असला तरी कांदाचाळ बनविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
मजुरांचे दर वाढलेमजुरांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रांजणगाव व कारेगाव येथील मजूर अड्ड्यावर म्हणेल ती मजुरी देण्यासाठी शेतकरी तयार होत आहेत. महिला मजूरसाठी ५०० ते ६००, तर पुरुष मजुरासाठी ६०० ते ९०० रुपये मजुरी शेतकरी देत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.
मागील आठवड्यात एक एकर कांदा काढणीस सुरुवात केली असून, अजून चार ते पाच दिवस कांदा काढणी चालेल. उन्हामुळे कांदापात करपून गेली आहे. त्यामुळे कांदा काढणीसाठी अडचण येत आहे. बाजारभाव घसरल्याने उत्पादन खर्च निघू शकत नाही. नवीन कांदाचाळ तयार करून चाळीत कांदा साठवणूक करणार आहे. - विजय ढमढेरे, शेतकरी, दहिवडी
अधिक वाचा: भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय