ओतूर: रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने दर्जेदार उत्पादन माळशेज परिसरातील दिवाळीनंतर ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, ठिकेकरवाडी, घोलवड, हिवरे खुर्द, डुंबरवाडी आदी गावांसह परिसरातील शेतकरी बांधव कांदा लागवडीसाठी अधिक उत्सुक असतात.
निवडणुकीत सध्या मजूर मिळत नसले तरी कुठूनही मजूर आणून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबंग सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यात माळशेज परिसर कांदा आगार म्हणून ओळखला जातो.
माळशेज परिसरातून शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत ७० ते ८० टक्क्यांनी घटली आहे.
त्यामुळे बाजार समितीत कांदा प्रतिकिलो ६० ते ७० रुपये दराने विकला जात आहे. तर कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव आला असून, एक एकर कांदा लागवड करण्यासाठी रोपासाठी ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत.
कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी असली तरीही कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. रोपाची मागणी वाढल्याने यावर्षी माळशेज परिसरात ७० ते ७५ टक्के कांद्याची लागवड होईल, असा अंदाज आहे.
सध्या माळशेज परिसरातील शेतकऱ्याकडील उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात.
अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाणांपासून रोपे तयार करतात, रोपांची लागवडीयोग्य वाढ झाली की ते विक्रीही असेल त्या बाजारभावाने विक्रीही करतात. माळशेज परिसरात यावर्षी कित्येक शेतकऱ्याचे टाकलेले रोप पाडाक झाले, तर काही शेतकऱ्याचे उतरले.
रोप अवकाळीने घालवल्यामुळे ज्या शेतकऱ्याचे कांदा रोप टिकली त्यांनी आपली लागवड उरकून दुसऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या भावात मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची विक्री करत आहेत.
काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपे विकत घेत असून, आपली लागवड उरकून घेत आहेत. बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात, जेव्हा कांद्याची टंचाई निर्माण होते तेव्हा भाव वाढतात, सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नसल्यामुळेच सध्या कांद्याला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव आहे, तर रोपाला एकरी ३५ ते ४५ हजार द्यावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या कांद्याला भाव असल्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे लगबग सुरू आहे.
तालुक्यात यंदा अवकाळी झटका दिल्याने काही प्रमाणात कांद्याची लागवडीत घट होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. काही शेतकरी अवकाळीने रोप मेली तरी कृषी दुकानांमधून आता २ हजार रुपयांनी बी घेऊन रोप टाकत आहेत, तर काही पैरा करताना पाहायला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा पेरणी करून कांदा लागवडीकडे कल वाढताना दिसत आहे. कारण रोपाचे वाढलेले दर सद्या मजुरीत झालेली वाढ, खत औषधांचा वाढलेला दर याचा मेळ बसत नाही. त्यामुळे भांडवली खर्च पाहता कांदा परवडणारा नाही व बाजारभावाची अनिश्चितता त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. - नंदू भोर, कांदा उत्पादक शेतकरी