विठ्ठल खेळगीसोलापूर : राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या कांदा महाबँकेचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा पुणे, अहमदनगरच्या शेतकऱ्यांचा अधिक होणार आहे. त्यामुळे महाबँकेची उभारणी कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक असते. कांद्यासाठी नाशिक, लासलगावांपेक्षा सोलापूर मार्केट प्रसिद्ध आहे. कांद्याचा दर पडल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतो. नोव्हेंबर ते जानेवारी अशा तीन महिन्यात मोठी आवक असते.
सुमारे १००० ते १२०० ट्रक कांद्याची आवक असते. अशा वेळेत हमखास दर पडतो. त्यामुळे आता राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प असून, कांद्याच्या महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करता येईल आणि जेव्हा चांगला भाव असेल तेव्हा शेतकऱ्यांना विक्री करता येईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील कांदा हिवाळ्यात येतो. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान येणारा कांदा टिकत नाही. त्यामुळे साठवणूक करणे अशक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतर येणारी आवक ही पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून होत असल्याने त्यांचा कांदा साठवणूक करता येतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या कांदा महाबँकेचा कितपत फायदा होईल, हे पाहावे लागणार आहे.
एका वर्षात ८० लाख क्विंटल आवकसोलापूर बाजार समितीत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ मध्ये तब्बल ८० लाख ५ हजार ७५३ क्चिटल कांद्याची आवक झाली आहे. म्हणजे वर्षभरात ७९ हजार ७२९ ट्रक सोलापूर मार्केटमध्ये येतात. त्यातून कोट्यवधी रुपयांचा उलाढाल होतो. बाजार समितीलाही सर्वाधिक सेस कांद्यातून मिळतो. त्यामुळे कांदा महाबँक झाल्या इतर जिल्ह्यांतूनही आवक होईल, असे वाटते.
कांदा महाबँक केल्यास सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा त्याचा लाभ होणार नाही. कारण, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल डिसेंबर आणि जानेवारीमध्ये येतो. त्यात सोलापूर पिकणारा कांदा टिकत नाही. त्यामुळे साठवणूक करता येत नाही. या उलट पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून येणारा माल टिकतो. त्यांच्याकडील कांदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येतो. तो कांदा दिवाळीपर्यंत टिकतो. - केदार उंबरजे, कांदा व्यापारी, सोलापूर