Join us

Kapus Soybean Anudan : ह्याच शेतकऱ्यांना मिळणार कापूस आणि सोयाबीनचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 9:50 AM

एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे.

सोलापूर : एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे.

मात्र, मागील वर्षी ई-पीक पाहणी केलेल्या जिल्ह्यातील एक लाख ७१ हजार २८२ खातेदारांच्या खात्यावर आता बक्षीस जमा होणार आहे. राज्य शासन खरीप व रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी नोंद करण्याचे दरवर्षीच आवाहन करते.

अनेक शेतकरी शासनाच्या आवाहनाला दाद देत ई-पीक नोंद करतात. मात्र, बहुतेक शेतकरी दुर्लक्ष करतात. हे दरवर्षीच होते. तलाठी, कृषी सहायक व संबंधित लोक शेतकऱ्यांना ई-पीक नोंद करण्याचे आवाहन करतात. मात्र, शेतकरी दुर्लक्ष करतात. कधी-कधी कानाडोळा करणे नुकसानीचे ठरते.

तसाच प्रकार मागील वर्षीच्या ई-पीक नोंदीबाबत झाला आहे. राज्य शासनाने २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकांसाठी हेक्टरी ५ हजार रुपये, दोन हेक्टरपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून निर्णयाबाबत ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादीच जिल्हास्तरावर पाठवली आहे.

सामाईक खातेदार व वैयक्तिक खातेदार अशा दोन गटांत शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे. दोन्ही प्रकारच्या एक लाख ७१ हजार २८२ अनुदानास पात्र शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आली आहे.

शासनाकडून कापूस पिकांची १०९९ व सोयाबीनची १,७०,१८३ शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे. २०२३ मध्ये ई-पीक नोंद केलेल्या शेतकऱ्यांची ही यादी आहे. यादीतील शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेले संमतीपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाइल नंबर, सामाईक खातेदार असेल तर आधार लिंक असलेले एकाचे बँक खाते १४ ऑगस्टपर्यंत कृषी खात्याकडे जमा करावे. - दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

टॅग्स :शेतकरीपीकपीक विमाराज्य सरकारसरकारसोयाबीनकापूसशेती