तुषार वांढेकरअहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच कापूस वेचणी करावी लागत आहे. कापूस वेचणीसाठी पंधरा ते सोळा रुपये भाव देऊनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
गावातील स्थानिक मजूर टॅम्पोद्वारे बाहेरील गावात कापूस वेचणीसाठी जात असल्याने स्थनिक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच राहिला आहे. इतर पिकांच्या कामाला मजूर प्राधान्य देत आहेत.
कापूस वेचणी त्रासदायक काम असल्याने याकडे मजूर दुर्लक्ष करीत आहेत, असे सांगितले जाते. एक महिला दिवसभरात किमान ६० ते ८० किलो कापूस वेचणी करते.
कापसू वेचणीला १६ रुपये भाववाढ देऊनही महिला कापूस वेचणीला येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, दुसरीकडे कापसाचे भावही अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी झाली आहे.
मजुरांची होते पळवापळवी• ज्या गावात मजूर आहेत त्या गावात इतर गावांतील शेतकरी जाऊन कापूस वेचणीसाठी जास्तीचा भाव देऊन त्या गावातील मजूर सकाळीच मालवाहतूक टॅम्पोद्वारे घेऊन जातात.• त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस तसाच राहत असल्याने दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे दिसते.
दुसऱ्या जिल्ह्यातून आणले मजूरस्थानिक मजूर मिळत नसल्याने जालना, नांदेड या जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी मजुरांच्या जोड्या आणल्या आहेत. त्यांना राहण्याची व जेवणाची सोय करून १० ते १२ रुपये किलोप्रमाणे कापूस वेचणीला दिला आहे.
कपाशीची लागवड नको रे बाबा..!• कपाशीची लागवड शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानले जाते. मात्र, कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे पांढरे सोने शेतात तसेच राहत आहे.• त्यामुळे शेतकरी म्हणतात, यापुढे कपाशी लागवड नको रे बाबा.
पंधरा दिवसांपासून कापूस वेचणीसाठी गावातील मजुरांना विनंती करत आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील लहान- मोठ्यांसह सर्वच सदस्यांना कापूस वेचणी करावी लागत आहे. - संजय दरंदले, शेतकरी, सोनई