पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राज्यातील तब्बल ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना ५० हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.
या शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्यासाठी आता ७ सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून या मुदतीत त्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात आला आहे.
बँकेत केवायसी करणेही बंधनकारक■ ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ किवा २०१९-२० या वर्षात घेतलेले कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी तसेच ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते.■ मात्र, अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता आला नव्हता. त्यात बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता.
शेतकऱ्यांना माहिती देण्याच्या सूचना■ राज्यभरात अशा शेतकऱ्यांची संख्या तब्बल ३३ हजार ३५६ इतकी आहे. या योजनेत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.■ आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महाआयटीमार्फत मेसेज पाठविण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना व्यक्तीशः कळविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.■ पुणे जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार ५४४ पैकी १ लाख ३६ हजार ५७४ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील १ लाख ३५ हजार १४५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले होते.
लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्याअनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले, परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. - प्रकाश जगताप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण