Join us

Katepurna Dam Water Release : काटेपूर्णा धरणातून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 1:34 PM

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस (Rain) बरसल्याने काटेपूर्णा धरणात (Katepurna Dam) सद्यःस्थितीत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता (Rabi Season) पाणी सोडण्यास (Water Release) प्रारंभ झाला असून, १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे (Irrigation) उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

अनिस शेख

यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस बरसल्याने अकोला जिल्ह्याच्या काटेपूर्णा धरणात सद्यःस्थितीत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून, १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

गतवर्षी जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने काटेपूर्णा धरणात उपलब्ध असलेला जलसाठा लक्षात घेत आणि अकोला शहरासह इतर गावांतील ग्रामस्थांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची बाब लक्षात घेता पाटबंधारे विभागाने ७ हजार हेक्टर क्षेत्रावर 'रब्बी'चे उद्दिष्ट ठरविले होते.

यावर्षी धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३ हजार हेक्टर क्षेत्र वाढून एकूण १० हजार हेक्टर क्षेत्रावर 'रब्बी' सिंचनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

या भागाला धरणाच्या पाण्याचा लाभ!

या पाण्याचा फायदा काटेपूर्णा धरणापासून पळसो बडे, अन्वी मिर्झापूर, मजलापूर दापुरा, भटोरी, कौलखेड या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या माध्यमातून रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांची पेरणी जोमाने होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

...म्हणून लवकर सोडले पाणी

दरवर्षी १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान रब्बी हंगामात सिंचनाकरिता धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते; मात्र यंदा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी १० नोव्हेंबरच्या आधी नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने ९ नोव्हेंबर रोजी धरणाच्या सिंचन व्हॉल्व्हमधून रब्बी पिकाकरिता पाणी सोडले.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ९ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाकरिता धरणाचे पाणी नदी पात्रात सोडले. त्यामुळे गहू, हरभरा पिकाची वेळेवर पेरणी करता येईल. याचा फायदा परवानाधारक शेतकऱ्यांना अवश्य मिळणार आहे. - अब्दुल रशीद शेख कालू, शेतकरी, महान.

गतवर्षी धरणात कमी जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांना 'रब्बी सिंचनाकरिता मोजके पाणी सोडण्यात आले. फेब्रुवारीच्या अखेर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. यावर्षी ९ नोव्हेंबरपासून नदीला पाणी सोडल्याने गहू, हरभरा पेरणीस प्रारंभ करणार आहे. - गोपाल सरोदे, शेतकरी, महान.

गतवर्षी धरणातून अपुरे पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांना गव्हाचे पीक जास्त प्रमाणात घेता आले नाही. यावर्षी धरण तुडुंब भरले आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी ३ हजार हेक्टर क्षेत्र वाढवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात गहू पीक घेता येईल. - मंगेश भांगे, शेतकरी, चिंचखेड.

हेही वाचा :  Oil Seed Production : खाद्यतेलांच्या किमतीत २५ टक्क्यांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय; वर्षभर खाणार घरचेच आरोग्यदायी तेल

टॅग्स :जलवाहतूकशेती क्षेत्रशेतीशेतकरीरब्बीअकोलाविदर्भकाटेपूर्णा धरण