Join us

Kaustubh Diwegaonkar : पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली! वखार महामंडळावर नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:56 AM

Kaustubh Diwegaonkar : कौस्तुभ दिवेगावकर यांची कारकिर्द वादळी ठरली होती. त्यांनी अनेक ठिकाणी चांगले काम केले आहे.

Animal Husbandary Department : राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. राज्याच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा (सेवा) यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला असून वखार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन आयुक्त दिवेगावकर यांनी पशुसंवर्धन विभागाची पुण्यातील ताथवडे येथील जमीन एमआयडीसीला देण्यासाठी विरोध केला होता. तिथे विभागाकडून काही प्रकल्प सुरू असल्यामुळे ही जमीन एमआयडीसीला देता येणार नसल्याचा अहवाल त्यांनी दिल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणून बदली केल्याचं बोललं जातंय.

पशुसंवर्धन विभागाकडून दर दहा वर्षांनी पशुगणना करण्यात येते. ही पशुगणना सध्या सुरू असून पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तपदावर आता डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवरे हे राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. 

दिवेगावकर यांनी बोगस गोशाळांच्या अनुदानाला विरोध केल्यामुळेही त्यांच्यावर राजकीय दबाव वाढल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर त्यांनी विभागातील कामात सुसुत्रता आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यानंतर विभागात नाराजी पसरली होती. त्यानंतर आता राज्यभर पशुगणना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना आयुक्तांची बदली झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी