शेती व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायद्याचा करायचा असल्यास इतरांपेक्षा वेगळं काही करायची मानसिकता ठेवली पाहिजे. तूर हे खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात येणारे पीक आहे. चांगले व्यवस्थापन केले तर तुरीचे चांगले धान्य उत्पादन मिळते. त्याचबरोबर कडधान्याचे पीक असल्याने तुरीचे बेवडही चांगले पडून पुढील पिकास त्याचा निश्चित फायदा होतो.
यावर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड झालेली असून पिकाचे उत्पादनही चांगले मिळण्याची शक्यता आहे. २ ते ३ पाणी द्यायची सोय असल्यास तुरीचा खोडवा ठेवून आहे त्याच तुरीच्या पिकापासून जास्तीचे उत्पादन मिळवणे कधीही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
खोडवा ठेवतेवेळी ज्या ठिकाणी तुरीच्या शेंगांचे गुच्छ लागलेले असतील अशा पक्व झालेल्या शेंगा तोडून त्याच्याखाली दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवून फांदी कापून टाकावी. हलकी वखरणी करून एकरी एक गोणी डीएपी खत देऊन पाणी द्यावे. पहिल्या पिकाच्या शेंगा तोडल्यानंतर खोडवा ठेवताना सुरूवातीला दिलेल्या पाण्यानंतर साधारणपणे वीस दिवसांनी पुन्हा फुटवे येते वेळी पाणी द्यावे.
अधिक वाचा: उत्पादन वाढीसाठी उन्हाळी भुईमुगाची लागवड कशी कराल?
तिसरे पाणी त्यानंतर वीस दिवसांनी शेंगा भरताना द्यावे. खोडवा पीक तणविरहीत ठेवण्यासाठी तीन ते चार आठवड्याच्या आत एक खुरपणी व नंतर एक ते दोन कोळपण्या द्याव्यात. फुलकळी लागताना व फुलोरा जोमात असताना अशा दोन वेळी २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) १९:१९:१९ या खताची पिकावर फवारणी करावी. त्यामुळे तुरीच्या दाण्याची प्रत चांगली मिळते तसेच तुरीच्या वजनातही वाढ होते.
तुरीच्या आयसीपीएल ८७/८८०/३९/१५१ या कमी कालावधीच्या जातींचा शक्यतो खोडवा ठेवावा. विपुला, बीएसएमआर ७३६/८५१ किंवा बीडीएन-७०८ या जास्त कालावधीत तयार होणाऱ्या जातींचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरत नाही.
डॉ. कल्याण देवळाणकर