नारायणगाव : गेली २५ वर्ष द्राक्ष निर्यात करणारे रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात लावलेल्या ३ एकर क्षेत्रातील शेतातून उत्पादित केळींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे.
सोमवारी या उच्च दर्जाच्या केळींचा १५ टनचा पहिला कंटेनर दुबई, कतार, कुवेत आणि ओमान येथे निर्यात करण्यात आला. नारायणगावच्या शेतातून आखाती देशात थेट केळी पोहोचणार आहे.
यामुळे नारायणगावला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याने जुन्नर तालक्यातील केळी बागायतदारांमध्ये उत्साह वाढला आहे.
वारूळवाडी (नारायणगाव) येथील शेतकरी रमाताई व प्रगतिशील शेतकरी ऋतुपर्ण मेहेर हे गेली २५ वर्षापासून चायना, हांगकांग, दुबई या देशांमध्ये दरवर्षी ८० ते ९० टन द्राक्ष ते निर्यात करतात, द्राक्ष निर्यातीच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी तीन एकर क्षेत्रात केळी लावली.
बागेसाठी वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांचे तसेच कृषी विज्ञान केंद्र यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले आहे. आता एका घडावर ९ ते १० फण्या तयार झालेल्या आहेत.
निर्यात केळीला एकरी ३० ते ३५ टन उत्पन्न मिळणार असून, आखाती देशात १५ ते २५ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळणार आहे. मेहेर यांना एक एकर बागेसाठी त्यांना सव्वा लाख रुपये खर्च आलेला आहे.
साधारणपणे एकरी ५ लाख २५ हजार रुपये उत्पन्न मिळेल. सव्वा लाख रुपये खर्च जाता ४ लाख रुपये प्रतिएकरप्रमाणे तीन एकर क्षेत्रातील उत्पादित केळीचे १२ लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी माहिती ऋतुपर्ण मेहेर यांनी दिली.
यावेळी आमदार शरद सोनवणे, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, संचालक ऋषिकेश मेहेर, शास्रज्ञ राहुल घाडगे, भरत टेमकर, सुनील वामन, अजय बेल्हेकर आदी उपस्थित होते.
केंद्राचे मार्गदर्शन
१) निर्यातीकरिता दर्जेदार उत्पादन १ निघावे यासाठी आवश्यक असणारे फ्रूट केअर आणि स्कटिंग बॅगचा अवलंब आणि ८ बाय ५ फुटावर केलेली लागवडीचा फायदा झाल्याचा ऋतुपर्ण मेहेर यांनी सांगितले. त्याचेच फलित म्हणून आज दुबई, कतार, कुवेत, ओमान या देशात होणारी निर्यात आहे.
२) निर्यातक्षम केळी पिकविण्याकरिता नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे आणि कृषिरत्न अनिल मेहेर यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभल्यामुळे चांगले उत्पन्न घेतले. त्याचा फायदा त्यांना विक्रीमध्ये होताना पहायला मिळत आहे.
उत्तर पुण्यात केळीचे क्लस्टर
१) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या मदतीने डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जुन्नर व नाशिक येथील सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात केळीचे क्लस्टर उभारण्याचे काम व केळी कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी सहकार्य करतात.
२) सोमवारी आखाती देशात १५ टनाचा केळी कंटेनर पाठविण्यात आला. या कंटेनरचे पूजन रमाताई व ऋतुपर्ण मेहेर यांच्या हस्ते गणेश पूजन, फीत कापून करण्यात आले व तो कंटेनर आखाती देशात जाण्यासाठी सोडण्यात आला.
१० फण्याची केळी
निर्यात केळीला एकरी ३० ते ३५ टन उत्पन्न मिळणार असून, आखाती देशात १५ ते २५ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळणार आहे. मेहेर यांना एक एकर बागेसाठी त्यांना सव्वा लाख रुपये खर्च आलेला आहे.
जुन्नर तालुक्यामध्ये १९३० सालापासून केळीचे पीक घेतले जाते. परंतु मथल्या काळात नैसर्गिक आपत्ती, कोरोना, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यातील क्षेत्रफळ कमी झाले होते. अलीकडच्या काळात कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन राज्य शासनाच्या मग्नेट प्रकल्पाच्या सहकार्याने वेळोवेळी केळी पिकाची चर्चासत्र आयोजित केली. त्याचे फलित पिकाचे क्लस्टर उभारणीला झाली. आज तालुक्यात केळी पिकाची मूल्य साखळी उभी राहिल्याचे दिसते. - अनिल तात्या मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र
कृषी विज्ञान केंद्रामुळे केळीसारखे पीक थेट किल्ले शिवनेरी येथून आखाती देशात निर्यात होतोय याचा अभिमान आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आहे. तालुक्यामध्ये येणाऱ्या काळात कृषी हब तयार करण्याचा मानस असून, जास्तीत जास्त तरुणांना कृषिक्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. - शरद सोनवणे, आमदार