Join us

खादी एक वस्त्र वैभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 5:09 PM

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कारातून प्रोत्साहन

खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमांत  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मागील ६४ वर्ष अविरतपणे काम केले आहे, असे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  या वेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले त्यात सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना प्रथम, पुणे येथील प्रमोद रोमन यांना द्वितीय तर गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार ठाणे येथील सुजाता पवार, नांदेडचे बालाजी काजलवाड, अमरावतीच्या उज्वला गोपाळ चंदन यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

पुरस्काराने ग्रामीण उद्योजकांना प्रेरणा मिळते. ग्रामीण रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंडळ अनेक योजना राबवित आहे. मधाचे गाव ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मधमाशी पालन हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय लोकाभिमुख होत आहे. मंडळ ६४ वर्ष ग्रामीण जनतेसोबत असून त्यांच्याकरिता रोजगार निर्माण करून लोकांना अर्थसहाय्यासोबत अनुदान देखील मंडळाकडून देण्यात येत असल्याचे साठे यांनी सांगितले.

रोजगार, पर्यावरण आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मंडळाचे योगदान मोठे आहे. आज अखेर हजारो लोकांना मंडळाने हाताला काम देऊन स्वावलंबी केले आहे. ग्रामीण उद्योजक खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम करत आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचे आर. विमल यांनी सांगितले.

कार्यक्रमात मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामोद्योग अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात पुरस्कार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी म्हाम्बरे यांनी तर आभार रेश्मा माळी यांनी मानले.या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, अर्थसल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, नित्यांनद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राज्यातील विविध भागातील यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :शेती क्षेत्रखादीशेतकरीशेतीकृषी योजना