Kharif Jowar in Washim: वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ९१४५.९४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, बाजरी आणि मका या तृणधान्य पिकांची पेरणी अपेक्षित आहे. त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७६२३७.७१ हेक्टर, बाजरीचे क्षेत्र २८०.२० हेक्टर, तर मक्याचे क्षेत्र ५७२.४० हेक्टर आहे.
प्रत्यक्षात ज्वारीची पेरणी १३८.४० हेक्टर (१.८४ टक्के), बाजरीची पेरणी ०७.०० हेक्टर (२.५० टक्के), तर मक्याची पेरणी ३७.०० हेक्टर (४.९० टक्के) एवढीच झाली आहे. तृणधान्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ २.९५ टक्के क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचा अधिकाधिक भर अद्यापही सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांवरच आहे.
खरीप हंगामात तृणवर्गीय पिकांतून शेतकऱ्यांना फारसे उत्पादन होत नाही. शिवाय, बाजारात या पिकांना अपेक्षित दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात या पिकाकडे पाठ करीत आहेत.
रब्बी आणि उन्हाळी हंगामात वाढतो पेरा जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीचे पीक घेण्याबाबत शेतकरी उदासीन आहेत. कारण, या खरिपातील ज्वारीस अपेक्षित दर मिळत नाही. शिवाय या पिकांना वन्यप्राण्यांचा खूप धोका असताे. तथापि, रब्बी आणि उन्हाळी हंगामात मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी करतात. गत रब्बी हंगामात जिल्ह्यात १ हजार २१७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली होती, तर उन्हाळी हंगामात १ हजार १८४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली होती.
तृणधान्याचे सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर)
- ज्वारीचे सरासरी क्षेत्र - ७६२३७.७१
- ज्वारीची प्रत्यक्ष पेरणी - १३८.४०
- बाजरीचे सरासरी क्षेत्र - २८०.२०
- बाजरीची प्रत्यक्ष पेरणी - ०७.००
- मक्याचे सरासरी क्षेत्र - ५७२.४०
- मक्याची प्रत्यक्ष पेरणी - ३७.००