Join us

खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:38 AM

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

या निर्णयामुळे २७३ खंडकरी शेतकरी कुटुंबांना लाभ होऊन १७२.२३ एकर गुंठे क्षेत्र देय करता येईल. सन २०१२ च्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील १ एकरापेक्षा जास्त देय क्षेत्र असलेल्या २ हजार ५४५ पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना २४ हजार ९५ एकर क्षेत्र वाटप करण्यात आलेले आहे.

प्रमाणभूत क्षेत्राप्रमाणे १० ते २० गुंठे क्षेत्र देय असलेले ८३ (क्षेत्र ३२. २९ एकर गुंठे) व २१ ते ४० गुंठे क्षेत्र देय असलेले १९० (क्षेत्र १३९. ३४ एकर गुंठे) खंडकरी आहेत. शासन अधिसूचना दिनांक ८ ऑगस्ट २०२३ अन्वये प्रमाणभूत क्षेत्रात सुधारणा करून ते बागायती जमिनीसाठी १० गुंठे व जिरायती जमिनीसाठी २० गुंठे असे करण्यात आले आहे.

टॅग्स :शेतकरीराज्य सरकारराधाकृष्ण विखे पाटीलएकनाथ शिंदेशेती