- रविंद्र शिऊरकर गंगापूर : खरिपात कमी झालेल्या पावसामुळे जेमतेम पीक हाती आले. मुख्य पिक असलेल्या कपाशीतून देखील जिथे ८-१० क्विंटल कापूस निघायचा त्या शेतातून अवघा ५-७ क्विंटल कापूस उत्पादन मिळाले. खरीप हंगाम नाही साधता आला तरी रब्बी मध्ये ही उणीव भरून निघेल, 'देव बघतोय सगळं तो उपाशी नाही मारणार' अशी अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र रब्बी हंगामही निराशादायी ठरला.
घरासमोर बांधलेल्या सर्जा राजाला खायला काय देणार? आपण काहीही खाऊन जगू पण त्यांना काय खाऊ घालायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून ही जनावरे आज रोजी विकून पुन्हा पुढील हंगामात नवीन घ्यायची असं जरी ठरवलं तरी आज बेभाव विक्री सुरू असल्याने शेतकरी दुहेरी अडचणी आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाजगाव, खादगाव, डोमेगाव, देर्डा, फुलशिवरा, गोळेगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी आपल्याकडील जनावरांना चारा छावणी उभी करावी यासाठी शासनदरबारी हाक देत आहे. खरिपातील मका पिकांतून देखील शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पाणी न मिळाल्याने मका पिकांची वाढ झाली नाही. त्यातही जो काही चारा या मका पिकापासून मिळाला तो नगण्य होता तर काही अंशी शेतकऱ्यांचा चारा शेतातच असल्याने आणि गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळीने तो कालवंडल्याने जनावरांना खाऊ घालण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे आता मोठी चारा टंचाई निर्माण झाली आहे.
गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी लागवडी शून्य बारामाही गहू, हरभरा यासोबत चारा पिके म्हणून घेतली जाणारी ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांची गंगापूर तालुक्यातील काही भागात शून्य लागवड असून शेतकरी आत्ता पासूनच ज्या शेतकऱ्यांकडे गहू बाजारी आहे त्यांच्याकडून खरेदी करून उदरनिर्वाहासाठी साठवणूक करून ठेवत आहे. तसेच या महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा या गावांत दिसून येत आहे.
अनेक शेतकरी आपल्याकडील दुधाळ जनावरे तसेच लहान मोठी वासरे तर काही शेतकरी आपल्या जिवाभावाचे बैल सुद्धा विकत असून सध्या खरेदी करणारे कमी असल्याने जनावरांचे भाव कमी आहे. चारा टंचाई दुष्काळ आणि कमी झालेले दूध दर यामुळे जनावरांचे बाजार येणाऱ्या काळात मंदीत राहण्याचे चित्र दिसून येत आहे. - एकनाथ डोंगरे (जनावरांचे व्यापारी, गाजगाव ता. गंगापूर)