पाऊस अन् सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर परिणाम जाणवत आहे. काही भागातील पिकांवर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाणथळ भागातील जमिनीवरील पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणीवर जोर लावला जात आहे.
शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन धाराशिव कृषी विभागाने केले आहे. यंदा जून महिन्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जुलै महिन्यातही पाऊस होत असून सरासरी ओलांडली आहे. याचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होत आहे.
सध्या पिकांची उंची व माल लागण्यासाठी अंतर मशागत महत्त्वाची आहे. मात्र, सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे जमिनीत वाफसा होत नाही. यामुळे काही भागात अंतर मशागत करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच पिकांना सूर्यप्रकाशाची कमतरता भासत आहे.
यामुळे पाणथळ क्षेत्रातील पिके पिवळी पडत आहेत. काही भागातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे.
२४ जुलैपर्यंत पाऊस...
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध भागात तुरळक व मध्यम पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी २० ते २४ जुलै दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
जमिनीतील झिंक, लोह वाढवा...
• सोयाबीनसह विविध पिकांच्या वाढीसाठी झिंक, लोह, हायड्रोजन, ऑक्सिजन, मॅगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्लेनम, क्लोरिन आदी महत्त्वाची अन्नद्रव्ये आहेत.
• पिवळी पिके हिरवी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार झिंक सल्फेट खताचा वापर करावा. लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी पालाशयुक्त खताचा (पोटॅशिअम सल्फेट) उपयोग करावा.
सर्व पिके चांगली आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. काही जमिनीत झिंक व लोहाचे प्रमाण कमी आहे, त्या क्षेत्रातील पिके पिवळी पडत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून उपाययोजना करावी. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी