फकिरा देशमुख
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०२४-२५ च्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा कमी करून कापूस व मका लागवडीकडे भर दिला आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळत नाही.
कारण, आजही अनेक शेतकऱ्यांकडे भावाअभावी सोयाबीन घरात पडून आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस व मका लागवडीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यात आतापर्यंत १५७.५ मिमी पाऊस झाला असून, ५६.३७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
भोकरदन तालुका हा तसा कापूस, मका, सोयाबीन व मिरची पिकाच्या लागवडीत अग्रेसर आहे, गेल्या पाच- सात वर्षांत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी विदर्भ पॅटर्न राबवून सोयाबीन व त्यानंतर हरभरा कमी खर्चातील पिके घेण्यावर भर दिला होता.
यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांना मृग नक्षत्राची लागवड साधता आली आहे, मात्र लागवडीनंतर पाहिजे तसा पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांची पिके अंकुर बाहेर काढत आहेत, त्याला पावसाची आवश्यकता असून, पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा कापसाला कमी भाव होता तरीदेखील शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून आले आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
तालुक्यात काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राची लागवड साधावी म्हणून पेरणी केली आहे, मात्र पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी लागवड थांबवली आहे. परंतु, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत लागवडीची घाई करू नये. - रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी
भोकरदन तालुक्यातील शेतकरी हतबल
आमच्या परिसरात शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली. तेव्हापासून पाऊस पडला नाही, त्यामुळे पिकांचे जमिनीबाहेर आलेले अंकुर वाळून जात आहेत. शेतकऱ्यांनी मोला-महागाचे बी-बियाणे व खते टाकले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गेल्यावर्षीच्या कोणत्याही मालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचा व्यवसाय करण्यास कोणीही पुढे येत नाही. - रामसिंग डोभाळ, शेतकरी.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
तालुक्यातील इब्राहिमपूर, मुठाड, आव्हाना, दानापूर, कठोरा बाजार, वाकडी, नांजा, क्षीरसागर, तांदुळवाडी, जळगाव सपकाळ, धावडा आदी भागात लागवड केलेली पिके पावसाअभावी खराब होत आहेत, त्यामुळे चार-पाच दिवसांत पाऊस आला नाहीतर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भोकरदन तालुक्यात सरासरी १७१ मि. मी. पाऊस
• यंदा तालुक्यात आतापर्यंत १७१ मि. मी. पाऊस झाल्याची तहसील कार्यालयात नोंद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे.
• तालुक्यातील केदारखेडा, राजूर, हसनाबाद व सिपोरा बाजार या महसूल मंडळात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे; मात्र उर्वरित तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे.
हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान