Join us

Kharif Kanda खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 9:37 AM

या वर्षी खरीप हंगामात ३.६१ लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% अधिक आहे.

यंदा मौसमी पाऊस योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे. कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा, टोमॅटो व बटाटा या भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे कमी झाले असले तरीही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता पुरेशी आहे. कांद्याचे पीक तीन हंगामात घेतले जाते; मार्च ते मे हा रब्बी हंगाम, सप्टेंबर ते नोव्हेंबर खरीपाचा आणि जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे उशिराचा खरीप हंगाम.

पैकी रब्बी हंगामात एकूण उत्पादनाच्या ७०% कांद्याचे उत्पादन होते तर, खरीप व उशिराच्या खरीप हंगामात मिळून ३०% उत्पादन होते. रब्बी आणि खरीपाच्या सर्वोच्च उत्पादनाचा काळ यांच्या दरम्यान येणाऱ्या कमी उत्पादनाच्या महिन्यांमध्ये कांद्याचा दर स्थिर ठेवण्यात खरीपाचा कांदा महत्त्वाची भूमिका बजावतो.

या वर्षी खरीप हंगामात ३.६१ लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत २७% अधिक आहे.

कांद्याचे सर्वोच्च उत्पादन घेणारे राज्य असलेल्या कर्नाटकात १.५० लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याच्या लागवडीचे उद्दीष्ट असून त्यातील ३०% क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर मोठ्या कांदा उत्पादक राज्यांमध्येही लागवडीचे प्रमाण चांगले आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा २०२४ च्या रब्बी हंगामातील असून यंदा मार्च ते मे या कालावधीत गोळा केलेला आहे. २०२४ च्या रब्बी हंगामातील १९१ लाख टन कांदा निर्यातीवर दरमहा १ लाख टनाची मर्यादा कायम ठेवल्यास देशांतर्गत बाजारपेठेतील सुमारे १७ लाख टनांची मासिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

रब्बी हंगाम सुरू असताना व त्यानंतर रब्बीचे उत्पादन गोळा करताना यंदा हवामान कोरडे राहिल्यामुळे साठवणीत कांद्याचे नुकसान कमी करण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात घेतलेला कांदा बाजारात आणल्यामुळे एकीकडे कांद्याची वाढलेली उपलब्धता आणि दुसरीकडे, मौसमी पावसाला सुरुवात झाल्यामुळे हवेतील आर्द्रतेत झालेली वाढ यामुळे साठवणीतील कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी कांद्याचे दर स्थिरावत आहेत.

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीकर्नाटकपीकखरीपबाजारपाऊस