अरुण बारसकर
सोलापूर: लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे.
मागील वर्षी खरीप, लेट खरीप व रब्बी हंगामात राज्यात ३० जिल्ह्यांत ६ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीची नोंद झाली होती. मागील वर्षी राज्यातच साधारण पाऊस पडला होता. सोलापूर जिल्ह्यात मात्र अल्पसा व केवळ जुलै महिन्यात साधारण पाऊस पडला होता.
जून महिन्यात कोरडी हवा तर जुलै महिन्यात बेताचा पाऊस पडल्याने खरीप पेरणीही बेताची झाली होती. राज्यात व जिल्ह्यात पाण्याच्या अंदाजावर कांदा लागवड उशिराने (लेट खरीप) झाली होती. यंदा काही जिल्ह्यांचा अपवाद सोडला तर राज्यात ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पेरणी जून महिन्यातही मोठ्या प्रमाणावर झाल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारीवरून दिसत आहे.
यंदा जून-जुलै महिन्यात कांदा पेरणीवर भर दिल्याने खरीप हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. त्यामध्ये सोलापूर २९ हजार हेक्टर तर अहमदनगर जिल्ह्यात २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.
राज्यात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व इतर जिल्ह्यांची कांदा लागवडीची क्रमवारी असते. यंदा मात्र खरीप हंगामात सोलापुर, अहमदनगर जिल्ह्यात कांदा क्षेत्र अधिक दिसत आहे.
मागील आठवड्यापर्यंतची आकडेवारी पाहिली असता सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात २३ हजार ५०० हेक्टर, पुणे जिल्ह्यात सहा हजार, बीड चार हजार सहाशे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३३७ हेक्टर, सातारा जिल्ह्यात अठराशे हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात एक हजार तर धुळे जिल्ह्यात सहाशे हेक्टर कांदा लागवडीची नोंद आहे.
पेरणीमुळे कांदा क्षेत्रात वाढ
साधारण कांद्याचे बी टाकून रोप तयार करून कांदा लागवड केली जाते, मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणीवर भर दिला आहे. कांद्याचे रोप तयार झाल्यानंतर लागवड होईल तेव्हा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्र सोलापूरपेक्षा अधिक होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
सततच्या पावसाचा फटका
संततधार असलेल्या भागातील कांद्याची टाकलेली रोपे व पेरणी केलेली रोपे पिवळी पडून जळून चालली आहेत. त्याचा फटका लागवड होणाऱ्या क्षेत्राला बसणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याचा फटका लेट खरीप लागवडीला बसणार आहे.