Join us

Kharif: या जिल्ह्यातील ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:11 PM

Kharif season: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरोधात सध्या कृषी विभागाची जोरदार मोहीम सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १४ टक्के पाऊस (Kharf) झाला असला तरी सार्वत्रिक दमदार पाऊस झालेला नाही. खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये बी, बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी केली असली तरी नियमांना बगल देत शेतकऱ्यांची कथितस्तरावर फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील ११८ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. सोबतच २०७ प्रकारच्या कृषी साहित्याच्या विक्रीवरही कृषी केंद्रातील अनियमितता पाहता बंदी घालण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात १६८२ कृषी केंद्र असून, या कृषी केंद्रांची तालुकानिहाय कृषी विभागाने तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर काही कृषी केंद्रामध्ये अनियमितता आढळून आली आहे तर काही कृषी केंद्रांनी गुणनियंत्रक पथकास तपासणीस सहकार्यच केले नसल्याचे समोर आले. संधी देऊनही काही कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आल्याने कृषी विभागाने याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट होत आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते मिळावे व बनावट बियाण्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभगाने बियाणे, खतांच्या निरीक्षणाची मोहीम तालुकानिहाय हाती घेतली आहे. प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून संबंधितांना त्रुटी दूर करण्याचे सूचित केले गेले होते. मात्र, काहींनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा न केल्यामुळे ही भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

१८८ नमुने तपासणीसाठी दुसरीकडे तपासणीदरम्यान ज्या कृषी केंद्रांमधील बी, बियाणे व रासायनिक खतांबाबत तपासणी पथकांना संशय आला अशा ठिकाणचे नमुने गेऊन ते प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. जवळपास १८८ प्रकारचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

यासोबतच १० कीटकनाशकांचे नमुने आणि ५४ रासायनिक खतांचे नमुने तपासणीस पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, २०७ प्रकारच्या कृषी साहित्याच्या विक्रीवरही पाहणी अंती विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :खरीपशेती क्षेत्रशेतकरी