पुणे : गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात होत असलेल्या मोठ्या पावसामुळे कोकण तसेच पूर्व विदर्भातील भात लावणीला वेग आला असून राज्यातील राज्यात १ कोटी ३७ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सरासरी क्षेत्राच्या ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.
यंदा खरिपात सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत १९ टक्क्यांची वाढ झाली असून, आतापर्यंत ४९ लाख ४४ हजार हेक्टर सोयाबीन लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ सहा टक्के असून, कापसाच्या क्षेत्रात मात्र सरासरीच्या तुलनेत तीन टक्क्यांची घट आहे.
राज्यात यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने खरीप पेरण्या वेळेत सुरू झाल्या. त्यामुळे उडीद, मूग, यासारख्या कमी कालावधीच्या कडधान्यांच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या. यंदा राज्यात ३ लाख ९३ हजार १९६ हेक्टरवर उडीद तर २ लाख २७ हजार ५८६ हेक्टरवर मुगाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली असून आतापर्यंत ४९ लाख ४४ हजार ६२९ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या तुलनेत ११९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
कापसाखालील क्षेत्र तीन टक्क्यांनी घटले■ गेल्या वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी १०६ इतकी आहे. सोयाबीन नंतर राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे राज्यात आतापर्यंत ४० लाख ६२ हजार २१६ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के कापसाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत मात्र हे क्षेत्र ९९ टक्के इतके आहे. कापसा- खालील क्षेत्र सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी घटले आहे.■ कोकण तसेच पूर्व विदर्भात पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळे या दोन्ही भागांमध्ये भात लावणी पूर्णत्वाकडे गेली आहे. राज्यात १० लाख ७० हजार १३८ हेक्टरवर भाताची पेरणी ७१ टक्के झाली असली, तरी पाऊस कमी झाल्यानंतर येत्या आठवडाभरात संपूर्ण लावणी पूर्ण होईल, असेही आवटे म्हणाले. सर्वाधिक १३२ टक्के पेरणी पुणे विभागात, सर्वांत कमी ७९ टक्के पेरणी कोकण विभागात झाली आहे.
विभागनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये) टक्के
कोकण | ३२६९९४४ | ७९,०५ |
नाशिक | १९७०७०३ | ९५.४५ |
पुणे | १४०९१५४ | १३२.३१ |
कोल्हापूर | ६८९४०५ | ९४.६८ |
संभाजीनगर | २०३६४८३ | ९७.४३ |
लातूर | २७३१३९१ | ९८.७१ |
अमरावती | ३०७११५३ | ९७.२२ |
नागपूर | १५९६६४५ | ८०.९३ |
एकूण | १३७८४८७९ | ९७.०६ |