अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील सोलापूर, धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या १०० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीपपेरणी झाली आहे. गुरुवारपर्यंत धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यात १०३ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात १४१ टक्क्यांपेक्षा अधिक पेरणीची नोंद झाली आहे. राज्यात सोलापूर जिल्हा उद्दिष्टाच्या पेरणीत प्रथम क्रमांकावर आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही जिल्ह्यांत दमदार पाऊस पडला. त्यानंतर सगळीकडेच पाऊस सुरू झाला. ज्या जिल्ह्यात पेरणीसाठी पोषक पाऊस पडला तेथे खरीप पेरण्यांनी तेवढाच वेग घेतला.
राज्यात यंदा सर्वच जिल्ह्यांत खरीप पेरणीची लगबग सुरू असली तरी सोलापूरसह लगतच्या धाराशिव व अहमदनगर जिल्ह्यांत अधिक वेग असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात तब्बल चार लाख ८ हजार हेक्टर म्हणजे उद्दिष्टाच्या १४१ टक्के इतकी पेरणी झाली असून आणखीनही पेरणी सुरूच असल्याचे सांगण्यात आले.
शेजारच्या अहमदनगर व धाराशिव जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असून आणखीन पेरणी क्षेत्रात वाढ होईल, असे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचे खरीप पेरणी सरासरी क्षेत्र दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर असताना पेरणी चार लाख ८ हजार १११ हेक्टरवर झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात सरासरी क्षेत्रापेक्षा पाच लाख १७ हजार म्हणजे १०३ टक्क्यांपर्यंत, तर अहमदनगर जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार म्हणजे १०३ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडील आकडेवारी सांगतेय.
राज्यात सव्वाकोटी हेक्टरपर्यंत पेरणी■ राज्यात यंदा लवकर खरीप पेरणी सुरू झाल्याने पेरणीचा आकडाही लवकर वाढला आहे. शिवाय बैलांऐवजी ट्रॅक्टरचा नांगरणी, कुळवणी व पेरणीसाठी वापर होत असल्याने दररोज राज्यात लाखांच्या पटीत पेरणी क्षेत्र वाढत आहे. गुरुवारपर्यंत राज्यात एक कोटी २० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती.■ सोयाबीनची सर्वाधिक ४६ लाख हेक्टर, तूर ११ लाख हेक्टर, मका १० लाख हेक्टर, कपाशी ४ लाख हेक्टर, भात तीन लाख ७० हजार हेक्टर, बाजरी साडेतीन लाख हेक्टर, उडीद सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.■ सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर उद्दिष्ट असताना ३ लाख ४६ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी झाली होती.■ यंदा त्यात वाढ होत ४ लाख ८ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी उद्दिष्टांचा विचार केला असता राज्यात सर्वाधिक आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात चार लाखांहून अधिक क्षेत्रावर प्रथमच खरीप पेरणी झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.