सोलापूर : उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानाच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंटीमेशन रद्द केल्या असताना पात्र तक्रारीच्या सर्वेक्षणासाठीही अनेक ठिकाणी कोणी पोहोचले नाही. जिल्ह्यातील या स्थितीबाबत विमा कंपनी व कृषी विभाग गंभीर नसल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात नियमित पाऊस तर सरासरीपेक्षा अधिक झालाच, शिवाय परतीच्या पावसानेही कहर केला. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पाऊस थांबल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे इंटीमेशन (तक्रार) नोंदविणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक कालावधीत तक्रार नोंदवली तर ती अपात्र ठरवली जाते.
पाऊस नसताना तक्रार नोंदविणे, एकच तक्रार अनेक वेळा नोंदविणे, अर्धवट तक्रार नोंद करणे, कापूस पीक नोंद, विमा भरणा केला नसताना तक्रार नोंद करणे आदी कारणावरून विमा कंपनीने ६४ हजार इंटीमेशन अपात्र (रद्द) केल्या आहेत.
एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंटीमेशन रद्द केल्या असताना पात्र तक्रारीचा सर्व्हे करण्यासाठी अनेक ठिकाणी कोणी पोहोचले नाहीत. त्यामुळे इंटीमेशन पात्र असलेले व अपात्र झालेले शेतकरी गॅसवर आहेत.
ड्युप्लिकेट तक्रारी २७ हजार
एकच तक्रार दोन वेळा व इतरमुळे ड्युप्लिकेट २७ हजार इंटीमेशन अपात्र, काढणी सुरू असताना ६६०, अर्धवट तक्रार दीड हजार, १२ हजारी तक्रारी अवैध, उशिराने १२५ हजार ५४४, कालावधी नसताना ६ हजार, पाऊस नसताना ८०० अशा ६४ हजार तक्रारी अपात्र ठरल्या आहेत.
कंपनीने १ लाख ७६ हजार इंटीमेशनचा सर्व्हे झाला असे पत्र दिले आहे. पीक नुकसान तक्रारीचा आढावा आज-उद्या विमा कंपनीकडून घेणार आहे. काही सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याच्या आलेल्या तक्रारीबाबत विमा कंपनीला बोललो आहे. पैसे मागत असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी खात्याकडे तक्रार करावी. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी