पुणे : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या १० दिवसांत आतापर्यंत १९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. यातून ६ हजार २२९ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै ही अंतिम तारीख असून गेल्या वर्षी सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यामुळे येत्या २० दिवसांत ही संख्या पूर्ण होईल का याबाबत कृषी विभाग चिंतेत पडला आहे.
राज्यात गेल्या वर्षी एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातून १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती. यंदाही राज्य सरकारने हा विमा एक रुपयात देण्याचे ठरवले असून १६ जूनपासून ही योजना सुरू झाली आहे.
गेल्या १० दिवसांत १९ लाख ७८ हजार ७३८ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून त्यातून १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. यातून ६ हजार २२९ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली आहे.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ २० दिवसांचा कालावधी उरला असून त्यात सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांचा सहभाग होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षाची संख्या गाठण्यासाठी दरदिवशी किमान साडेसात लाख अर्ज प्राप्त होणे अपेक्षित आहे.
मात्र, मंगळवारी (दि.२५) सकाळी ११ वाजल्यापासून बुधवारी (दि. २६) ११ वाजल्यापर्यंत केवळ ४ लाख ६४ हजार २०७ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाचा आकडा यंदा गाठता येईल का, या विवंचनेत कृषी विभाग आहे.
राज्यात या योजनेत सहभागी झालेले सर्वाधिक ६ लाख ८८ हजार ४६८ शेतकरी संभाजीनगर विभागातील आहेत. तर सर्वात कमी ५ हजार ६४६ शेतकरी कोकण विभागातील आहेत.
सहभागी शेतकरी
कोकण - ५,६४६
नाशिक - १,२८,३७०
पुणे - २,५७,०६२
कोल्हापूर - २०,२१३
संभाजीनगर - ६,८८,४६८
लातूर - ५,३०,७१०
अमरावती - ५,३०,७१०
नागपूर - ७१,८९७
यंदा जूनमध्येच चांगले पर्जन्यमान झाल्याने पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचा तत्काळ विमा काढावा. अजूनही २० दिवसांचा कालावधी आहे. शेतकऱ्यांनी या योजनेला लाभ घ्यावा. - रवींद्र बिनवडे, आयुक्त, कृषी
अधिक वाचा: Pik Vima एक रुपयात पीक विमा काढताय? कसा कराल मोबाईलवरून अर्ज