Join us

Kharif Planning खरिपासाठी शेतकऱ्यांची धावाधाव; रोटर, बैलांच्या औतालाही वेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:09 AM

बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटर मारण्याचे प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे.

कोल्हापूर : मान्सून उंबरठ्यावर आल्याने शेतकऱ्यांची खरीपपेरणी तयारीची लगबग वाढली आहे. मशागतीची कामे एकदम सुरू झाल्याने ग्रामीण भागात रोटर, बैलांच्या औतासाठी वेटिंगवर थांबावे लागत आहे.

बैलांची संख्या फारच कमी झाल्याने छोट्या, मोठ्या रोटरना खूपच मागणी वाढली आहे. रोटर मारण्याचे प्रत्येक गावात वेगवेगळे दर पाहावयास मिळतात. बैलांचे औत काहीसे महागले आहे.

यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये वेळेवर दाखल झाला असून तो गतीने पुढे सरकत आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात तो तळकोकणातून कोल्हापुरात दाखल होईल, असा अंदाज आहे.

त्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाचे वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमिनी तयार करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. बांध धरणे, नांगरट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; पण मशागतीसाठी बैलांचे औत, रोटर वेळेत मिळेनात.

बैलांची संख्या कमी झाल्याने गावात एक-दोनच बैलांची औत असते. त्यालाही खूप मागणी आहे, त्यामुळे आठवडाभर नंबर लावून ठेवावे लागत आहे. बैलांची संख्या कमी होऊ लागली तसे औतांचे दरही वाढू लागले आहेत.

त्यातही गडबडीत जमीन तयार करून पेरणी करायची झाल्यास लहान रोटरचा वापर चांगला होतो; पण तेही वेळेत मिळत नाही. शेतकऱ्याला सकाळी लवकर रोटर चालकाच्या दारात जाऊन बसावे लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

बैलांची संख्या कमी होऊ लागली तसे औतांचे दरही वाढू लागले आहेत. सध्या काही गावांत प्रति दिन १२०० ते १३०० रुपये दर आहे. रोटरचे दर कामानुसार ठरलेले आहेत, तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत बैलांच्या औतांच्या दरात वाढ झाली असून रोटरचे दर प्रत्येक गावातील मागणीनुसार आकारले जात असल्याचे चित्र आहे.

शिवारं फुललीखरीप तयारीसाठी शिवारं अरक्षशः फुलून गेली आहेत. सकाळी लवकर शेतकरी कुटुंबातील सगळीच शिवारात दाखल झालेली असतात. दिवसभर झटून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.

मशागतीचे दर (प्रति गुंठा)नांगरट करून सरी सोडणे - ₹२५०रोटरने नांगरट - ₹१५०उसाची भरणी - ₹१३०बैल औत (प्रति दिन) - ₹१२००

रोटरच्या मशागतीच्या दरात फारशी वाढ झालेली नाही; पण एकूणच कष्ट व जोखमीचे काम पाहता दर कमीच आहेत. एकदमच सगळ्यांची कामे सुरू झाल्याने कोणाकडे जायचे, असा प्रश्न तयार होतो. - सरदार खाडे, रोटर चालक

अधिक वाचा: Monsoon Update खूशखबर! पुढच्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये; सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक पडणार

टॅग्स :खरीपपेरणीपीकशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन