दर वाढतील, अशा अपेक्षेने मागील दोन वर्षांपासून काही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन विक्रीविना राहिले आहेत. आता खरिपाची तयारी सुरू झाली आहे. यंदा तरी मागील वर्षाची कसर भरून निघेल, या आशेने शेतकरी पुन्हा सोयाबीनकडे वळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.
नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भागावर सोयाबीनची पेरणी होते. सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी दरावर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम होत असतो. त्यामुळे दराची शाश्वती नसते. मागील दोन वर्षांपासून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आवक केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलाचे दर वाढू नये म्हणून केंद्र सरकारने विदेशातून खाद्यतेलाची मोठी आयात केली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला.
उत्पादन खर्चात आणि दरात मोठी तफावत
* सोयाबीनचा दर ४५०० ते ४७०० रुपये प्रतिक्चिटलच्या जवळपास स्थिर राहिला. वास्तविक, सोयाबीनचा दर ६ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाल्यास उत्पादन खर्चाची जुळवाजुळव होते.
* परंतु दोन वर्षांपासून उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादनासाठीचा खर्च आणि दर यात मोठी तफावत राहिली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तर सध्या सोयाबीनला बाजारात ४,४०० रुपये भाव
तीन वर्षापूर्वीच्या सोयाबीनला उच्चांकी १० हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु त्यानंतर सतत दर कमी होत गेले. आता बाजारात सोयाबीनला ४ हजार ४०० रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा शेतकरी सोयाबीनच्या पेरणीची तयारी करीत आहे.
शेती उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ
शेतकऱ्यांचा शेती उत्पादन खर्च दरवर्षी वाढत आहे. शेती व्यवसायावर संकटाचा डोंगर उभा राहत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे कठीण होत आहे. नैसर्गिक आपत्ती दरवर्षी येत असल्याने सोयाबीन उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.
उदगीर तालुक्यात यंदा तुरीचा पेरा वाढणार...
तालुक्यात खरिपाचे ६९ हजार २६४ हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. तुरीचा केवळ १२ हजार हेक्टरवर पेरा होता. यंदा तुरीला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकरी तुरीच्या क्षेत्रात वाढ करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८७० मिमी असून मागील वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने रब्बीसह तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.