Join us

Kharif seed: खत आणि बियाणांच्या लिंकींगला आला ऊत; या ठिकाणी बघा काय घडतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 4:47 PM

Kharif seed and fertilisers linking. खरीप हंगामाच्या तोंडावर खत आणि बियाणांच्या लिंकींगला ऊत आला असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम दुकानदारांकडून सुरू आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली (Kharif season) आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या पेरण्या लवकर होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने शेतकरी खतांच्या (fertilisers and seeds) खरेदीसाठी बाजारात येत आहेत.

परंतु, आता शहरातील बहुतेक कृषी केंद्र चालकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बियाणांची खरेदी करून साठा करून ठेवलेला आहे. बियाणे विक्री करावे या उद्देशाने आता व्यापाऱ्याकडून वेगळीच शक्कल लढवली जात आहे. अनेक शेतकरी मागील वर्षाचे सोयाबीन यावर्षी बियाणासाठी वापर करणार असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे ते फक्त खरिपासाठी आवश्यक असणारी युरिया, डीएपी ही खते खरेदीसाठी कृषी केंद्र सरकारकडे चौकशी करत आहेत. आता सोयाबीनचे बियाणे घेतले तरच खते उपलब्ध आहेत, अन्यथा खते नाहीत असा पवित्रा घेतल्यामुळे शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीपुढे अडवणूक होत असल्याचे बाजारात दिसून येत आहे. अगोदरच मागील वर्षाचे सोयाबीनचे दर न वाढल्याने विक्रीविना घरी माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे.

बाजारातून डीएपी खताचा साठा गायब

बाजारातून डीएपी खताचा साठा गायब आहे. अनेक शेतकरी कृषी केंद्रावर खताची खरेदी करण्यास गेले असता अनावश्यक खते व बियाणे घेण्यास भाग पाडत आहेत. आवश्यक त्या खताचा पुरवठा कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्याला केला जात नाही. याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अन्यथा आंदोलन करावे लागेल. - जनार्दन पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना उदगीर

कृषी विभागाकडून भरारी पथकेशेतकऱ्याची अडवणूक होणार नाही यासाठी कृषी विभाग अलर्ट आहे. भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जे कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची अडवणूक करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी डमी ग्राहक पाठवून बाजारात कृषी केंद्र चालक कशा पद्धतीने काम करत आहेत याची तपासणी करणार आहोत.- संजय नाबदे, तालुका कृषी अधिकारी, उदगिर, जि. लातूर

टॅग्स :खरीपशेतीखते