Kharif seed issue खरीपात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पेरणीसाठी बियाणे मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑनलाइन बियाणांची मागणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी बियाणांसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. बियाणांसाठी काही शेतकऱ्यांना मेसेजही आले. मात्र, तुमचे आमच्या यादीत नावच नाही, असे कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांना उत्तर दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना पेरणीकरिता सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध व्हावे, आसमानी आणि सुलतानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीकरिता मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन बियाण्याची मागणी करण्यास सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपले बियाणे मागणीचे अर्ज ऑनलाइन केले. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत तूर, सोयाबीन निवड झालेली आहे. अशा शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सहायकांशी संपर्क करावा, अशा सूचनासुद्धा मेसेजद्वारे मिळाल्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या गावाला असणाऱ्या कृषी सहायकांसोबत संपर्क केला. मात्र, आपले नाव माझ्या यादीत नाही, त्यामुळे आपणास बियाणे देणे शक्य नाही, आपण वरिष्ठ यांच्याशी संपर्क करावा, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याचे चित्र आहे.
साखरखेर्डा शेंदुर्जन या भागामध्ये मागणी जास्त असल्यामुळे उपलब्ध साठा अपुरा पडला. त्यामुळे काहींना मेसेज येऊनसुद्धा बियाणे देणे शक्य झाले नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत.
भागवत किंगर, तालुका कृषी अधिकारी