Join us

Kharif Sowing राज्यात पेरण्या केवळ १२ टक्केच, कुठे झाली किती पेरणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:40 AM

राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने Kharif Sowing खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

पुणे: राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

कापूस, सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी १५ ते १६ टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस जोर धरेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतरच पेरण्या मार्गी लागतील, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात ६ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर यंदा खरीप पेरण्या लवकर होतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती. ६ जूननंतर पुढील आठवड्यात मान्सूनने राज्यात विदर्भ वगळता सर्वदूर हजेरी लावली. मात्र, पूर्व विदर्भात मान्सून अद्याप पोहोचलेलाच नाही. गेल्या आठवड्यापासून मान्सून पश्चिम विदर्भातच रेंगाळला आहे.

त्यामुळे पूर्व विदर्भ वगळता राज्यात अन्यत्र काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत १६ लाख ८९ हजार ३६७ हेक्टर अर्थात ११.९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, ही आकडेवारी अद्ययावत होण्यास वेळ लागत असून, राज्यात आतापर्यंत १७ ते १८ टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

कापूस पिकाच्या ६ लाख ८९ हजार २३९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ही पेरणी १६ टक्के आहे. गेल्या वर्षी कापूस पिकाच्या १ लाख २६ हजार ९१६ हेक्टरवर पेरणी झाली होती. तर सोयाबीन पिकाचीही ६ लाख २७ हजार ७४४ हेक्टर अर्थात सरासरीच्या १५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी केवळ २२३ हेक्टरवरच पेरणी झाली होती.

तर मका पिकाचीही १ लाख ४० हजार १४२ हेक्टर अर्थात सरासरीच्या १५ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पावसाचा विचार करता लातूर विभागात चांगला पाऊस झाल्याने येथे आतापर्यंत ५ लाख १४ हजार ८१९ हेक्टर अर्थात १८.६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

त्याखालोखाल नाशिक विभागातील जळगाव, धुळे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या विभागात सरासरीच्या १४.६७ टक्के पेरणी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत १ ते १९ जून याकाळात सर्वाधिक पाऊस धाराशिव जिल्ह्यात १६० टक्के, लातूरमध्ये १५१ तर सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या १५९ टक्के झाला आहे. तर भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत मोठी तूट आहे.

विभागनिहाय पेरणी

विभागक्षेत्रटक्के
कोकण७,५३७१.८२
नाशिक३,०२,९५९१४.६७
पुणे४६,६७५४.३८
कोल्हापूर८३,८३९११.५१
संभाजीनगर३,२८,१५२१५.७०
लातूर५,१४,८१९१८.६१
अमरावती४,०३,०५९१२.७६
नागपूर२,३२६०.१२

राज्यात नाशिक व लातूर विभागात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या झाल्या आहेत. प्रत्यक्षात आकडेवारी १७ ते १८ टक्के आहे. पाऊस चांगला झाल्यानंतर यात आणखी वाढ होईल. - विनयकुमार आवटे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी विभाग

येत्या आठवडाभरात पावसाची स्थिती आणखी सुधारेल. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनची प्रगती होईल. - डॉ. कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

टॅग्स :पेरणीखरीपपीकमहाराष्ट्रसरकारपाऊसहवामान