Lokmat Agro >शेतशिवार > खरीप अद्याप शिवारात, रब्बीचा पेरा लांबणीवर

खरीप अद्याप शिवारात, रब्बीचा पेरा लांबणीवर

Kharif still in Shivara, Rabi sowing delayed | खरीप अद्याप शिवारात, रब्बीचा पेरा लांबणीवर

खरीप अद्याप शिवारात, रब्बीचा पेरा लांबणीवर

उशिरा मान्सूनचा परिणाम. परतीच्या पावसावरच रब्बीचा पेरा अवलंबून असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज आहे.

उशिरा मान्सूनचा परिणाम. परतीच्या पावसावरच रब्बीचा पेरा अवलंबून असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशिरा दाखल झाल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. त्याचा थेट परिणाम रब्बी हंगामावर झाला असून, ऑक्टोबर निम्मा संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप खरीप शिवारातच आहे. त्यामुळे रब्बीचा पेरा लांबणीवर पडला असून, परतीचा पाऊस झाला तरच रब्बीचे पेरणी क्षेत्र कायम राहील अन्यथा त्यात घट होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर खरिपाचा तर ऑक्टोबरपासून रब्बीचा हंगाम सुरु होतो. रब्बीच्या पेरणीसाठी हंगाम मोठा असल्याने डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली जाते. मात्र, यंदा निसर्गाने पिकांच्या हंगामाचे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. आपल्याकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात येणाऱ्या मान्सूनची एंट्री जूनच्या शेवटी झाली. जुलै महिन्यात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची उघड-झाप राहिली. त्यामुळे पेरणी करण्याचे वेळापत्रकच बदलून गेले. 

भात व नागली रोपे लागण ऑगस्टपर्यंत सुरु होती. साधारणत: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून खरीप काढणीचा हंगाम सुरु होतो. मात्र, यंदा ऑक्टोबर निम्मा झाला तरी खरीप शिवारातच आहे. काही ठिकाणी भुईमूग, सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. येत्या आठवड्यात भाताच्या काढणीला वेग येणार आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरीप काढणी होऊन रब्बीच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.

रब्बीचे पीक हे परतीच्या पावसावरच अवलंबून असते. यंदा परतीचा पाऊस अपेक्षित झालेला नाही. तो पुढे लागला तरच पेरण्या होऊ शकतात, अन्यथा क्षेत्र घटणार हे निश्चित आहे.

हलव्या भाताची कापणी
भाताचे सर्वांत लवकर येणारे ‘ हलवे’ भाताची सध्या कापणी सुरु आहे. त्या ठिकाणीच ज्वारी, मका, हरभरा यांची पेरणी सुरु आहे.

मागील हंगामात १०० टक्के पेरा
मागील हंगामात परतीचा पाऊस नोव्हेंबरपर्यंत राहिला. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या १०० टक्के झाल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती दिसत नाही.

दृष्टिक्षेपात कोल्हापूर जिल्ह्याचे रब्बी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
एकूण रब्बी क्षेत्र : २२,०७०, ज्वारी : ११,७९३,  गहू : १,७५६, मका : २,२२२, इतर तृणधान्ये : १५०, हरभरा : ४,७४८, इतर कडधान्ये : १,१३६, तीळ : ५, सूर्यफूल : १५७, इतर गळीत धान्ये : १०३

खरीप पेरण्या उशिरा झाल्याने रब्बी पेरणी लांबली जाणार आहे. परतीचा पाऊस कसा होईल, त्यावरच रब्बीचा पेरा अवलंबून राहणार आहे.
- अरुण भंगारदेवे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

Web Title: Kharif still in Shivara, Rabi sowing delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.