यंदा राज्यात 93 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून बहुतांश पेरणीची कामे उरकत आली आहेत. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भाताची पुनर्लागवड सुरू आहे.
आज राज्यात सोयाबीन पिकाची ४८.८ लाख हेक्टर क्षेत्रावर तर कापूस ४१.४७ लाख, तुर १०.७१ लाख एवढे पीक क्षेत्र आहे. सरासरी पाऊस यंदा कमी असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही स्पष्ट केले आहे.
१ जून ते ७ ऑगस्ट या कालावधी दरम्यान राज्याचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. राज्यातील खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध असून साधारण १९ लाख क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही तीव्र इशारा देण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांवर अजूनही चिंतेचे ढग घोंगावत आहेत. शेतकऱ्यांनी अंतर मशागतीची कामे करण्यास वेग दिला आहे.
राज्यांतर्गत पीक स्पर्धेची अंतिम मुदत
खरीप हंगामातील राज्यांतर्गत पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचा आवाहन कृषी विभागाने केले. भात,ज्वारी, मका, बाजरी, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी या स्पर्धेत सहभागी होता येऊ शकते.