Join us

Rabi Season : मराठवाड्यात सोयाबीन, उडदाच्या काढण्या सुरू! रब्बी ज्वारी, हरभरा पेरण्यांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 1:06 PM

Maharashtra Rabi Season Latest Updates : ऑक्टोबर महिन्याचे दोन आठवडे संपत आले तरी अजून मान्सूनचा पाऊस सुरूच असल्यामुळे परतीच्या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत आता ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Rabi Season Latest Updates : राज्यात यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक बरसल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. खरिपातील पिके चांगली आली असून अनेक ठिकाणी या पिकांची काढणी झाली आहे. ऑक्टोबर महिन्याचे दोन आठवडे संपत आले तरी अजून मान्सूनचा पाऊस सुरूच असल्यामुळे परतीच्या पावसाचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत आता ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, खरिपातील बाजरी, मूग, उडीद, सूर्यफूल आणि सोयाबीन या पिकांची काढणी मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव भागांत सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरूर कासार, बीड, माजलगाव आणि केज, आंबेजोगाई परिसरातील सोयाबीनच्या काढणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. सोयाबीन काढलेल्या शेतात लगेच रब्बी ज्वारीची पेरणी केली जात आहे.

मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यात राज्यातील सरासरीच्या सर्वांत कमी पाऊस पडला आहे. तर परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर परिसरातीलही खरीप पिकांची काढणी जोरात सुरू आहे. खरिपातील हरभरा आणि गहू पेरणीही शेतकरी करत आहेत. मराठवाड्यात हरभरा आणि गव्हापेक्षा ज्वारीची पेरणी जास्त क्षेत्रावर होते. 

ज्वारी हे पीक अत्यंत कमी पाण्यात आणि कमी खतामध्ये येते. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारी या पिकावर जास्त खर्च करण्याची गरज नसते. त्याबरोबरच जनावरांना पोषक असा कडबा उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा ज्वारीकडे कल असतो. गव्हासाठी पाण्याची गरज असल्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी या पिकाकडे पाठ फिरवतात. तर हरभराही मोठ्या प्रमाणावर पेरणी केला जातो.

सध्या आमच्या भागातील सोयाबीनच्या काढण्या आवरत आल्या आहेत. सोयाबीन काढलेल्या शेतात लगेच ज्वारीची पेरणी आम्ही केली आहे.- किशोर मोरे (शेतकरी, बीड)

आमच्या भागातील सोयाबीनची काढणी १५ दिवसांपूर्वी झाली. आम्ही आता ज्वारीची पेरणी केली असून ज्वारी उगवून आली आहे.- वैभव खोड (युवा शेतकरी, उंबरविहिरा, ता. पाटोदा, जि. बीड)

टॅग्स :रब्बीपीकमहाराष्ट्रशेती क्षेत्रशेतकरी