पुणे : मान्सूनच्या पावसाने राज्यभरात हजेरी लावली असून अनेक शेतकऱ्यांनी लागवडी आणि पेरण्या पूर्ण केल्या आहेत. तर मागच्या काही दिवसांमध्ये कापसाच्या विशिष्ट वाणाची कमतरता असल्यामुळे कृषी विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण गरजेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण कृषी विभागाने दिले आहे.
दरम्यान, राज्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि निविष्ठा पुरवठ्याचे योग्य नियोजन केले असून गरजेपेक्षा अधिक खते आणि बियाणे सध्या राज्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या अवस्थेमध्ये पाऊस चांगला झाला असून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण राज्यामध्ये खते आणि बियाणांचा तुटवडा नसल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय.
खरीप २०२४ साठी हंगामातील अपेक्षित पेरणी क्षेत्र, मागील ३ वर्षाची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर यानुसार पिक निहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असणाऱ्या बियाणांची माहिती घेऊन नियोजन करण्यात आलेले आहे. खरीप हंगाम २०२४ करीता १८.८९ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे. पण गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचबरोबर १७ जून अखेर १९ लाख १ हजार ५६४ (१०१%) क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, महाबीजकडे ३ लाख ७५ हजार ५७२ क्विंटल बियाणे, राष्ट्रीय बीज निगम कडे६२ हजार ७६० क्विंटल बियाणे आणि खासगी कंपन्यांकडे २० लाख ५३ हजार ४२७ क्विंटल बियाणे असे एकूण २४ लाख ९१ हजार ७५९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.