पुणे : राज्यात मान्सूनचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आणि लागवडी उरकून घेतल्या आहेत. तर बहुतांश भागातील पेरण्या अपूर्ण असल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. पण मागच्या एक ते दीड आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे.
दरम्यान, राज्यात अनेक शेतकऱ्यांनी कमी वापसा असतानाही पेरण्या केल्या आहेत. तर आत्तापर्यंत म्हणजेच २७ मे अखेरीस राज्यातील ५२ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील एकूण १ कोटी ४२ लाख हेक्टरपैकी ७३ लाख ८३ हजार ४४० हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा याच दिवशी दुप्पट क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागच्या वर्षी याच दिवशी राज्यातील एकूण ३ लाख ६१ हजार ६४५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर अजूनही पेरण्या सुरू असून जुलैच्या मध्यापर्यंत राज्यातील पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पेरण्यांची घाई नको
राज्यातील बऱ्याच भागांत पुरेसा पाऊस नसतानाही शेतकरी पेरण्यांची घाई करताना दिसत आहेत. तर कृषी विभागाकडून ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये असा सल्ला देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कमी पावसावर पेरण्या केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना येणाऱ्या काही दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास दुबार पेरण्याचे संकट येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई करू नये.
पीके आणि लागवडीखालील क्षेत्र
- एकूण तृणधान्ये - ८ लाख ९४ हजार ६७२ हेक्टर
- एकूण कडधान्ये - ९ लाख ५२ हजार १७७ हेक्टर
- एकूण अन्नधान्ये - १८ लाख ४६ हजार ८४९ हेक्टर
- एकूण तेलबिया - २९ लाख ५० हजार ६१७ हेक्टर
- कापूस - २५ लाख ८५ हजार ९७३ हेक्टर