Join us

खोरमधील अंजिराच्या खट्टा मिठ्ठा बहार हंगामास सुरुवात खरेदीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:42 AM

Khor Anjir खोरमधील डोंबेवाडी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रात अंजीर लागवड करण्यात आली आहे. डोंबेवाडीमध्ये फक्त अंजिराचे उत्पादन घेतले जाते. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाची समस्या दूर होते.

भांडगाव : खोर (ता. दौंड) मधून यावर्षीच्या अंजीर उत्पादनाच्या 'खट्टा' हंगामाला सुरुवात झाली आहे. खोरमध्ये जवळजवळ ४५० एकरवर अंजिराची लागवड करण्यात आली आहे.

खोरमधील डोंबेवाडी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रात अंजीर लागवड करण्यात आली आहे. डोंबेवाडीमध्ये फक्त अंजिराचे उत्पादन घेतले जाते. अंजीरामध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे पचनाची समस्या दूर होते.

अंजीर हे कमी उष्मांक असलेले फळ आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये अंजीराला मागणी असते. आरोग्यदायी, स्वादिष्ट, गोड अंजिराने पुणे व मुंबई या ठिकाणच्या बाजारपेठेत आपली गोडी निर्माण करून ग्राहक वर्गाला मनमोहून टाकले आहे.

अंजिराच्या 'खट्टा' बहाराच्या हंगामाला सुरुवात झाली असून ग्राहक वर्गाच्या पसंतीचे पहिले अंजीर बाजारपेठेत दाखल झाले असून पहिल्या खट्टा बहाराच्या खरेदीसाठी ग्राहक वर्गाने मोठी गर्दी केली आहे.

सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान खोरच्या परिसरात अंजिराचा 'खट्टा' बहार घेतला जातो. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी फळबागा धरल्याने अंजीर निघण्यास सुरुवात झाली आहे.

रुचकर व रसरशीत गोड वाण■ खोर गावच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांनी चांगल्या प्रकारचा बहार धरला आहे. खोरच्या पवित्रक शेतकरी उत्पादित कंपनी लिमिटेड यांनी घेतलेल्या अंजिराचा खट्टा बहार मुंबईच्या बाजार पेठेत ग्राहक वर्गासाठी विक्रीसाठी दाखल झाला असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी समीर डोंबे यांनी सांगितले.■ अतिशय चांगले, दर्जेदार, रुचकर व रसरशीत गोड वाण असलेले अंजीर ग्राहकांना अगदी पाहता क्षणी मनमोहून टाकत असून या अंजिराला मोठी मागणी बाजारपेठेत मिळत आहे. अंजीर सिजन सुरू झाला असल्याने अंजीर उत्पादक शेतकरी आपल्या अंजीर बागेत दंग झाला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

खट्टा बहाराचा हंगाम फेब्रुवारीमध्ये संपल्यानंतर मार्च ते जूनदरम्यान अंजिराचा मीठा बहार बाजारपेठेत दाखल होईल. त्यामुळे ग्राहक वर्गाला तब्बल आठ महिने अंजीर खाण्यास मिळणार आहे. केमिकलविरहित नैसर्गिकरीत्या डोंगराळ भागातील हे अंजीर असून ग्राहक वर्गासाठी आरोग्यदायी आहे. - समीर डोंबे, शेतकरी, खोर

टॅग्स :फलोत्पादनदौंडशेतकरीशेतीफळेपीक