बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : कोळगाव (ता. श्रीगोंदा) दत्तात्रय विश्वनाथ लगड यांना वडिलोपार्जित बारा एकर कोरडवाहू खडकाळ शेती. अशा शेतीतून कुंटुबाचा उदार निर्वाह करणे अवघड होते.
अशा परिस्थितीत त्यांची मुले हेमंत दत्तात्रय लगड व ज्ञानदेव दत्तात्रय लगड यांनी याच मातीत पॉलिहॉऊस उभे केले. विदेशातील झुकीनी, ब्रोकोली, रेड कॅप्सिकम, आइसबर्ग यांसारख्या भाजीपाल्यांची लागवड केली. त्यानंतर लगड परिवारात आर्थिक स्थिरता आली.
२०१५ मध्ये हेमंत व ज्ञानदेव दोघेही भाऊ पूर्णवेळ शेतीमध्ये उतरले. शेतीमध्ये उतरल्यानंतर शेतीचा फारसा अनुभव नसल्याने सुरुवातीला कोणती पिके घ्यायची, कोणत्या पिकातून शाश्वत उत्पन्न मिळेल, याचा जास्त अनुभव नव्हता.
परंतु, मोठा मुलगा हेमंत यांनी मार्केटिंग कंपनीमध्ये काम केल्यामुळे त्यांना मार्केटचा चांगला अभ्यास होता. त्यांनी आपल्या शेतामध्ये लाल आणि पिवळ्या ढोबळी मिरचीचा प्रयोग करण्याचे ठरविले.
पॉलिहाऊस उभारण्याचा प्रस्ताव कृषी विभागाकडे दिला. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत २०१५ साली वीस गुंठ्याचे पॉलिहाऊस उभारले.
मध्यंतरी त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. जवळपास २५ लाखाचे कर्ज झाले. कर्जबाजारीपणामुळे निराश न होता आत्मपरीक्षण केले.
पीक पद्धतीत बदल केला. रंगीत ढोबळी मिरची लागवड केली. १२ लाखांचे उत्पादन मिळाले. नंतर त्यांनी विदेशी भाज्या लागवड सुरू केली.
कोकणी मजुरांची साथ
कोकणातील मजूर कांदा लागवड, काढणीसाठी आणतात. त्यामुळे मजुरांचा प्रश्न मिटतो. लगड बंधूव त्यांच्या पत्नी शेतामध्ये राबतात.
राजधानीत मार्केटिंग
विदेशी भाजीपाल्याच्या मार्केटिंगसाठी दिल्ली, मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी मॉलमध्ये भाजीपाल्याची विक्री केली जाते.
शेतकऱ्याने जर शेतीचा अभ्यास, तंत्रज्ञानाचा वापर, स्वतः शेतीत लक्ष घातले, तर जीवनमान उंचावू शकतो. तसेच, इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. - हेमंत लगड, शेतकरी
शेतीत आव्हाने आणि रिस्क निश्चित आहे. आव्हानाचा सामना केला आणि नियोजनबद्ध शेती केली, तर शेतीतून कमी कालावधीत स्वप्न पूर्ण होऊ शकतात. - शशिकांत गांगर्डे, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा
अधिक वाचा: गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई