सतीश पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील ४७,८९१ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाऊन १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील जुलै महिन्यात नद्या पात्र सोडून वाहू लागल्या होत्या, कडवी, चांदोली, काळम्मावाडी आणि राधानगरी या चारही धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला.
कोल्हापूरमध्ये २० ते ३१ जुलै या ११ दिवसांत पावसाने हाहाकार माजवला. कोल्हापूर शहराला बेटाचे स्वरूप आले होते. शेती पुराच्या पाण्याखाली गेली होती.
जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. या उसावर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि एकूणच अर्थकारण चालते. पण, महापुराच्या तडाख्यात ऊस शेतीला फटका बसला आहे. जिल्ह्यातील जवळपास ४० हजार हेक्टर ऊस क्षेत्र पुरात बुडाले असून आता याचा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे.
साखर हंगामाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. उसाबरोबरच जिल्ह्यातील भुईमूग, सोयाबीन आणि भाजीपाला इतर पिकांचीही कोट्यवधींची हानी झाली आहे.
पंचगंगा नदीकिनारी असणाऱ्या करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील नदीकाठच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
तालुका आणि नुकसान हेक्टरमध्येशिरोळ - १०,०००हातकणंगले - ९५००करवीर - ७६८७पन्हाळा - ५९२४शाहूवाडी - ४६७३कागल - २४५३चंदगड - २३०९राधानगरी - १४७८गगनबावडा - १२९७भुदरगड - १०९३गडहिंग्लज - ८०७आजरा - ३६१
जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - अजित कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
करवीर तालुक्यातील घरांची नुकसानभरपाई नागरिकांना दिली आहे. पिकांच्या नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याची भरपाईदेखील लवकरच शासनाकडून होईल. - संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर